Pune : स प महाविद्यालयाच्या मैदानावर 3000 विद्यार्थ्यांची योग प्रात्यक्षिके

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशनचे (विकास) आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमात जवळपास 3000 विद्यार्थी, शिक्षक व सीए इन्स्टिट्यूट सहभागी झाले होते.

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षा ऋता चितळे, उपाध्यक्ष अभिषेक धामणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण प्रसारक मंडळी संचालित सर्व शाळांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. पतंजली योग समितीचे प्रितेश केले यांनी योग प्रात्यक्षिके करून घेतली. “आज आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा होत आहे. आपले आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी, स्मरणशक्ती वाढण्यासाठी रोज योगाभ्यास केला पाहिजे. आजचा दिवस त्यासाठी प्रोत्साहित करत असतो” असे ऍड. एस. के. जैन यावेळी म्हणाले.

‘आयसीएआय’च्या वतीने सीए, विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी फडके संकुल येथेही योगवर्गाचे आयोजन केले होते. हा योगवर्ग 1 जून ते 30 जून या कालावधीत होत असल्याचे अभिषेक धामणे यांनी सांगितले. योग दिवसाच्या निमित्ताने शिक्षण प्रसारक मंडळींच्या सहयोगाने 3000 विद्यार्थ्यांसाठी योग्य प्रात्यक्षिके आयोजिण्याची संधी मिळाली. सर्वांसाठी चटई आणि लाडवाचे वाटप करण्यात आल्याचे ऋता चितळे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.