Pune : नरवीर तानाजी मालुसरे यांना 321 फुट लांब 4 फूट रुंद भगव्या ध्वजाची अनोखी सलामी (व्हिडिओ)

लोणंद येथील भैरवनाथ डोंगर मॉनिंग वॉक ग्रुपचा उपक्रम

एमपीसी न्यूज- नरवीर तानाजी मालुसरें यांनी प्राणार्पण करून सिंहगड जिंकला. या घटनेला उद्या, मंगळवार 4 फेब्रुवारी रोजी साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने लोणंद येथील भैरवनाथ डोंगर मॉनिंग वॉक ग्रुपच्या सुमारे पन्नास सदस्यांनी सिंहगडावर जाऊन रविवारी, (दि. 2) नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी जाऊन 321 फुट लांब भगव्या ध्वजाची सलामी दिली. कल्याण दरवाजा मार्गे हा भगवा ध्वज हाती घेऊन हे सर्व सदस्य ‘जय शिवाजी…. जय भवानी’ असा जयघोष करीत निघाले होते.

भैरवनाथ डोंगर ग्रुपचे सदस्य एव्हरेस्टवीर प्राजीत परदेशी व संदीप शेळके यांच्या संकल्पनेतुन डोंगर ग्रुपचे संस्थापक शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण दरवाजा मार्गे 321 फुट लांब आणि 4 फूट रुंद भगवा ध्वज सिंहगडावर नेण्यात आला. पायथ्यापासुन सुमारे तीन किमी अंतर सुमारे दोन तासात पार करून तानाजी मालुसरे यांच्या समाधीसमोर सुमारे पन्नास सदस्यांनी अभिवादन केले. यावेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

या मोहिमेत पाच वर्षाचा आयुष विश्वास मिसाळ या मुलासह तीन महिला, सुमारे पन्नास सदस्यांनी सहभाग घेतला. शूरवीर तानाजी मालुसरे यांना भगवी सलामी देण्याच्या डोंगर ग्रुपच्या अभिनव कल्पनेचे सिंहगडावरील शेकडो मावळ्यांनी कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.