Pune : सिंहगडाचा पश्चिमकडा सर करुन 350 युवक-युवतींनी दिली नरसिंहाला मानवंदना – नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन

एमपीसी न्यूज – रणांगणावर रक्त सांडले, रणी धुरंदर वीर स्मरा… दुर्गम गड गाजविला रात्री, नरवीर केसरी घ्या मुजरा… अशा काव्यपक्तींमधून आणि जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषात 350 युवक-युवतींनी सिंहगडाचा पश्चिम कडा सर करीत जणू पुन्हा एकदा सिंहगडावर चढाई केली. मराठयांच्या इतिहासातील एक देदिप्यमान पर्व असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांनी गाजविलेल्या पराक्रमाला महाराष्ट्रातील तरुणाईने प्रत्यक्ष गडावर जाऊन आगळीवेगळी मानवंदना दिली. मावळ्यांच्या पोशाखातील तरुणाईने सुमारे ४० फुटी कडा दोराच्या सहाय्याने चढत मराठयांच्या शौर्याचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवला.

निमित्त होते, इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त आणि सिंहगड सर केल्याच्या घटनेला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ३५० युवक-युवतींनी सिंहगडाचा पश्चिम कडा दोरावरुन सर करीत तानाजी मालुसरेंना आगळीवेगळी मानवंदना दिल्याच्या कार्यक्रमाचे. गडावर झालेल्या कार्यक्रमाला सर्जिकल स्ट्राईकचे रणनीतीकार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त), ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी तानाजी मालुसरे यांच्या युद्धकथेवरील गौरी शेटे यांनी विविध कवितांचे एकत्रिकरण केलेल्या नरसिंहाचे गौरवगान या विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. एक्सप्लोरर्स या नामवंत टेÑकींग ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम दिवसभर सुरु होता.

राजेंद्र निंभोरकर म्हणाले, तानाजी मालुसरे यांनी गडावर केलेल्या चढाईप्रमाणे लष्करातर्फे देखील शत्रूवर चढाई केली जाते आणि ९० टक्के यश यामध्ये असते, असा अनुभव आहे. आपण इतिहास विसरलो, तर भूगोल निश्चित रहात नाही. पूर्वजांनी गाजविलेला इतिहास आपल्याला माहिती हवा, त्यातून तरुणांना प्रोत्साहन मिळेल. महाराष्ट्रातील मराठयांनी अटकेपार झेंडा रोवला. आजच्या पिढीला या गोष्टी माहिती हव्या. आपण तीर्थयात्रेला जातो, फिरायला जातो, त्यापेक्षा गड-किल्ल्यांवर आपण यायला हवे, त्यातून मोठी प्रेरणा मिळेल.

पांडुरंग बलकवडे म्हणाले, ज्या देशातील व्यक्ती स्वत:च्या घरातील कार्य सोडून देशासाठी बाहेर पडतो, तो देश नक्कीच पुढे जातो. आपला संघर्ष राष्ट्रासाठी आहे, देशभक्तीचा विचार पुढे गेला पाहिजे, ही भावना शिवरायांनी मावळ्यांमध्ये रुजविली. राष्ट्रभक्ती सोबतच संस्कृतीभक्ती व समाजभक्ती देखील त्यांनी रुजविली. त्यातून शिवरायांनी स्वराज्य निर्माण करीत लोककल्याणकारी आदर्श सुराज्य निर्माण केले.

सौरभ जगताप हा सहभागी युवक म्हणाला, ज्याप्रमाणे तानाजी मालुसरेंनी ३५० वर्षांपूर्वी हा किल्ला ताब्यात घेतला. त्या कडयावरुन आम्ही दोरावर गाठी बांधून आलो, तरी अवघड गेले. त्याकाळी त्यांनी कसे युद्ध केले असेल, याची कल्पना आपण करु शकत नाही. मावळी पोशाखात आम्ही सहभागी झालो होतो, त्यामुळे आम्ही शिवकाल पुन्हा एकदा अनुभवला.

मोहन शेटे म्हणाले, नरवीर तानाजी मालुसरे यांनी सिंहगड किल्ला जिंकून घेण्याच्या पराक्रमाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत़ सिंहगडासारखा बळकट दुर्ग आणि उदयभानू सारखा कडवा मोगल किल्लेदार असताना गड जिंकणे सोपे नव्हते़ पण अतुलनीय धाडस, गनिमी कावा तंत्राचा अचूक वापर, स्वराज्यावरील अभंग निष्ठा, गडाचा सर्वांगीण अभ्यास या गुणांमुळे मराठ्यांनी हा गड जिंकून घेतला़ ती रात्र होती १६७० सालच्या माघ वद्य नवमीची. त्यामुळे त्यांच्या शौर्याला आम्ही केवळ पूजा, आरती व घोषणांनी नव्हे, तर प्रत्यक्ष तो अनुभव घेऊन मानवंदना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.