एमपीसीन्यूज – शहरात दिवसभरात कोरोनाचा उद्रेक झाला. आज (सोमवारी) 399 नव्या रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात कोरोनाबाधित 10 रुग्णांचा मृत्यू झाला. 175 रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
महापालिकेच्या आरोग्य खात्याने ही माहिती दिली. पुणे शहरात सोमवारी (25 मे रोजी) कोरोनाचे एकूण 5 हजार 181 रुग्ण झाले आहेत. 31 मे पर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आणखी 6 दिवसांनी कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या पुण्यात ससून रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मिळून व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या 44 असून क्रिटिकल रुग्णांची संख्या 179 आहे.
पुण्यातील आत्तापर्यंतची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 5,181 आणि अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 2,182 , एकूण मृत्यू 264 झाले आहेत. आजपर्यंत एकूण डिस्चार्ज 2,735, स्वॅब तपासणी 689.
ससून रुग्णालयात नाना पेठेतील 58 वर्षीय पुरुषासह खराडीतील 79 वर्षीय, फुरसुंगीतील 68 वर्षीय, घोरपडीतील 62, कोंढाव्यातील 70 वर्षीय आणि येरवड्यातील 80 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, श्वसनाचा, हृदयाचा आजार, किडनीचा आजार, मधुमेह असे अनेक आजार होते.
पर्वतीमधील 82 वर्षीय पुरुषाचा सिम्बयोसिस हॉस्पिटलमध्ये, कोंढवा खुर्दमधील 37 वर्षीय पुरुषाचा सिम्बयोसिस हॉस्पिटलमध्ये, चांदनी चौकातील 62 वार्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, ताडीवालारोड भागातील 58 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.
पुणे जिल्हयात 5 हजार 899 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 998 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार623 आहे. कोरोनाबाधित एकूण 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 207 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यात आज कोरोनाचे 283 रुग्ण वाढले. जिल्ह्यात आता कोरोनाचे 6 हजार रुग्ण होण्याच्या आसपास आहेत.