Pune: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील वर्षीपेक्षा 4 टीएमसी पाणी कमी; तूर्तास पाणीकपात नाही

Pune: 4 TMC less water than last year in dams supplying water to the city; There is no water shortage right now 31 जुलैपर्यंत पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात आले असले तरी त्यापुढेही आहे, त्या प्रमाणातच पुणेकरांना पाणी मिळणार आहे.

एमपीसी न्यूज- पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत मागील वर्षीपेक्षा 4 टीएमसी पाणीसाठा कमी आहे. तरीही तूर्तास पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या 27 ते 28 टक्के पाणी साठा आहे. गतवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला होता. सध्या पाऊस लांबत चालला असला तरीही काही घाबरण्याचे कारण नाही.

31 जुलैपर्यंत पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात आले असले तरी त्यापुढेही आहे, त्या प्रमाणातच पुणेकरांना पाणी मिळणार आहे. सध्या पाणीकपात वगैरे काहीही करण्यात येणार नाही, अशीही माहिती अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

जून महिन्यात काही दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने अर्धा जुलै महिना संपत आला असला तरी दांडी मारली आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांत सध्या केवळ 8.33 टीएमसी पाणीसाठा आहे.

मागील वर्षी याच कालावधीत 12.58 टीएमसी पाणीसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत 4.25 टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे. या चारही धरणांची एकूण क्षमता 29. 15 टीएमसी आहे.

या धरणांतून बारामती, इंदापूर, हवेली, दौंड तालुक्यातील शेतीसाठी पाणी सोडण्यात येते. दरवर्षीचा अनुभव बघता साधारण जुलै महिन्यातच धरण क्षेत्रात पाऊस सुरू होतो.

सध्या मात्र रोज काळेकुट्ट ढग दाटून येतात. अधूनमधून पावसाचा शिडकावा होतो. आता जोरात पाऊस होणार असल्याचे चित्र निर्माण होते आणि पाऊस गायब होतो. त्यानंतर कधी ऊन पडते. असे विचित्र वातावरण पुणे शहरात निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.