Pune : खडकवासला धरणातून 4280 क्युसेक विसर्ग

एमपीसी न्यूज- खडकवासला धरण साखळी आणि मुळशी धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आज सकाळी 6 वाजल्यापासून खडकवासला धरणामधून 4 हजार 280 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे मुळा -मुठा नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी अशी सूचना जलसंपदा विभागाने दिली आहे. , मुळशी धरणामधून 9 हजार 700 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता तो आता सकाळी ९ वाजता बंद करण्यात आल्याची माहिती टाटा पॉवर धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी दिली आहे. 

आज, शुक्रवारी सकाळी 6 वाजता आलेल्या आकडेवारीनुसार, खडकवासला धरण परिसरामध्ये मागील 24 तासात 05 मिमी पाऊस पडला असून आजपर्यंत 947 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 1.97 टीएमसी इतकी वाढ झाली असून धरण 100 टक्के भरले आहे.

पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील 24 तासात 51 मिमी पाऊस झाला असून पाणी पातळीमध्ये 10.65 टीएमसीने वाढ झाली आहे. यंदाच्या मोसमात आजपर्यंत 2676 मिमी इतका पाऊस पानशेत धरण परिसरामध्ये झाला असून धरण 100 टक्के भरले आहे.

वरसगाव धरणामध्ये मागील 24 तासात 40 मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या मोसमामध्ये आजपर्यंत 2672 मिमी पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणी पातळीमध्ये 12.82 टीएमसी इतकी वाढ झाली असून धरण 100 टक्के भरले आहे.

टेमघर धरण पाणलोटक्षेत्रामध्ये मागील 24 तासामध्ये 79 मिमी पाऊस झाला असून यंदाच्या मोसमात आजपर्यंत एकूण 3667 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणी पातळीमध्ये 3.71 टक्के इतकी वाढ झाली असून धरण 100 टक्के भरले आहे.

चारही धरणात सरासरी 100 टक्के पाणीसाठा निर्माण झाला असून 29.15 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. मागील वर्षी याच दिवशी चारही धरणे सरासरी 88.78 टक्के भरली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.