Pune: आणखी नवीन पाच कोरोना ‘पॉझिटीव्ह’, पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित संख्या 45!

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे नवीन पाच पॉझिटीव्ह रुग्ण आज सापडले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45 झाली आहे. यात गुलटेकडी परिसरातील झोपडपट्टीतील दोघांचा तसेच बारामती येथील एका रिक्षाचालकाचाही समावेश आहे. नवीन रुग्ण सापडत असले तरी सुमारे 20 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण आकडा जास्त दिसत असला तरी सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या मात्र कमी आहे.

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुणे शहरात आढळला होता. त्यानंतर दोन-तीन दिवसांत पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढली. मात्र मुंबईने आघाडी घेतली आणि पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा स्थिरावला होता, मात्र गेल्या तीन दिवसांत पुन्हा पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी पाठविण्यात येऊ लागल्याने कोरोनाचा धोका कमी होऊ लागला आहे, असे वाटत असतानाच पुन्हा नवीन रुग्ण सापडू लागल्याने चिंतेत भर पडली आहे.

राज्यात आज एकूण 12 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले. त्यात पुण्यात पाच, मुंबईत तीन, नागपूरला दोन तर कोल्हापूर आणि नाशिकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची राज्यातील एकूण संख्या 215 झाली आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सर्वांनी 21 दिवस घरातच थांबावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. रस्त्यांवर संचारबंदी असतानाही अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किंवा अत्यावश्यक कामांच्या निमित्ताने अजूनही लोक रस्त्यावर दिसत आहेत. लोकांनी गर्दी टाळली व सामाजिक अंतरांचे भान ठेवले तरच ही साथ आटोक्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.