Pune : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 5 टीएमसी जास्त पाणीसाठा ; यंदा टंचाई जाणवणार नाही

एमपीसी न्यूज – मागील वर्षी पेक्षा यावर्षी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये तब्बल 5 टीएमसी जास्त पाणीसाठा असल्याने पुणेकरांना पिण्याची टंचाई जाणवणार नाही. सध्या मे महिना अर्धा संपत आला आहे. तर, यंदा लवकरच पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. ही पुणेकरांसाठी ‘गुड न्यूज’ मानली जात आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 1.29 टीएमसी, पानशेत 4.58 टीएमसी, वरसगाव धरणांत 3.95 टीएमसी असा एकूण 9.82 टीएमसी म्हणजेच 34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी धरणांत पाणीसाठा कमी असल्याने पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता.

यंदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 5 टीएमसी पाणी जास्त असल्याने पुणेकरांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवणार नाही. तरीही, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

जलसंपदा विभागातर्फे 31 जुलै पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षीही चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे ओला दुष्काळ निर्माण झाला होता. धरणांतून तब्बल 20 टीएमसी पेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले होते.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धारणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. धरणांतून महापालिका तब्बल 18 टीएमसी पाणी उचलत असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. पुण्यात सध्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यानंतर केवळ 9 टीएमसी पाणी लागणार आहे. 50 टक्के पाण्याची म्हणजेच 9 टीएमसी पाणी वाचणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.