Pune : शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ला 501 फळांचा नैवेद्य

501 fruits offered to 'Dagdusheth' on the occasion of Sheshatmaj Ganesh Jayanti

एमपीसीन्यूज : ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे संत्री, मोसंबी, टरबूज, केळी, डाळींब, आंबे, पेर, चिक्कू, अंजीर ,अननस, लिची अशा विविधरंगी 501  फळांचा फळांचा नैवेद्य दगडूशेठ गणपतीला दाखविण्यात आला.

याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. त्यामुळे ‘श्रीं’ना फळे व फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.

ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंतीनिमित्त मंदिरात गणेशयाग देखील झाला. फळे व फुलांच्या आकर्षक सजावटीसोबतच श्री गणेशाला फुलांचा पोशाख करण्यात आला.

त्यामध्ये मुकुट, अंगरखा, शुंडाभूषण यासह विविध अलंकार फुलांमध्ये साकारण्यात आले होते. भक्तांनी ट्रस्टचे संकेतस्थळ www.dagdushethganpati.com, फेसबुक, ट्विटर, यु टयूब आणि अ‍ॅप येथे श्रीं चे आॅनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Turn off for: English

गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे.

भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले.

अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले.

त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले.

श्रीशेष ध्यान करत असताना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर ,देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले.

या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.