Pune: शहरात दिवसभरात 51 रुग्ण कोरोनामुक्त! 93 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 1,611 वर

दिवसभरात सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू, कोरोना बळींचा आकडा 91

एमपीसी न्यूज – पुणे शहरात दिवसभरात कोरोनाचे 93 नवे रुग्ण नोंदविले गेले. त्यामुळे शहरातील आतापर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 611 झाली आहे. शहरात आज कोरोनाबाधित सहा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींचा एकूण आकडा 91 वर जाऊन पोहचला आहे. दिवसभरात 51 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी घटना म्हणावी लागेल. कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्यांची संख्या आता 325 झाली आहे.  

शहरात आज नव्याने 93 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात नायडू-पुणे महापालिका रुग्णालये 66, खासगी रुग्णालये 23 आणि ससून येथील चार रुग्णांचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत एकूण 91 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 60 मृत्यूंची नोंद ससून रुग्णालयात झाली आहे. औंध जिल्हा रुग्णालयात तीन, नायडू रुग्णालयात दोन, नोबेल रुग्णालयात दोन, इनामदार रुग्णालयात एक, जहांगीर रुग्णालयात एक,  नोबेल रुग्णालयात दोन, इनामदार रुग्णालयात एक, सह्याद्री रुग्णालय (कर्वे रोड) एक, पूना हॉस्पिटल एक, केईएम रुग्णालय पाच, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चार, सिम्बायोसिस रुग्णालय दोन, इन्लॅक्स बुधरानी एक, भारती रुग्णालय सहा,  एआयसीटी एक तर वायसीएम रुग्णालयात एक कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील 51 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात सिम्बॉयोसिस सेंटर 33, दीनानाथ रुग्णालय 8, नायडू रुग्णालय 6, ससून रुग्णालय 2 आणि सह्याद्री रुग्णालयातील दोघांचा समावेश आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. शहरात आतापर्यंत एकूण 325 रुग्णांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे.

आतापर्यंत पुणे महापालिका क्षेत्रातील 1,379 व ससून रुग्णालयातील 232 असे एकूण 1,611 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 91 जणांचा मृत्यू झाला तर 325 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आता शहरात 1,195 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.