Pune: तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेले पुण्यातील 60 जण क्वारंटाइनमध्ये : जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज – दिल्लीतील निझामुद्दीन मरकजमधील तबलिगी जमात या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या पुण्यातील 60 जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर, इतरांचा शोध सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिक दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. या 60 जणांपैकी कोणालाही करोनाची लक्षणे आढळून आलेली नाही. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

दरम्यान, पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यापूर्वी 7 रुग्णांची कोरोनाच्या संकटातून मुक्तता झाली. सध्या हे रुग्ण डॉकटरांच्या निगराणीखाली आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमध्ये 1 ते 15 मार्च दरम्यान झालेल्या तबलिगी जमात या कार्यक्रमात देश-विदेशातील हजारो भाविक सहभागी झाले होते. त्यात कोरोनाची बाधा झालेले अनेक रुग्णही सहभागी झाले होते. त्यामुळे त्या ठिकाणी कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला. या कार्यक्रमात सहभागी झालेले लोक आपापल्या गावी गेल्यामुळे देशात कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या सहाजणांचा तेलंगणामध्ये मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची दाहकता प्रकर्षाने पुढे आली. या कार्यक्रमात महाराष्ट्रातूनही शेकडोजण सहभागी झाले होते. त्यापैकी 126 जण पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यापैकी 60 जण सापडले असून त्यांना तातडीने क्वारंटाइन करण्यात आले आहे. उर्वरित लोकांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या संशयितांच्या घशातील द्रावाचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.