Pune : पुणे विभागात कोरोनाचे 646 रुग्ण – डॉ.दीपक म्हैसेकर 

12 रुग्ण गंभीर

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 646 झाली आहे. यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 520 असून  विभागात कोरोनाबाधीत एकुण 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत रुग्ण निरीक्षणाखाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.

डॉ.  म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हयात 589 बाधीत रुग्ण असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 26 बाधीत रुग्ण आहेत, तर कोल्हापूर जिल्हयात 6 बाधीत रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे विभागामध्ये आजपर्यत एकूण  8 हजार 188 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 7 हजार 600 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.  त्यापैकी 588 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 6 हजार 909 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आले आहेत, तर 646 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत विभागामधील 39 लाख 33 हजार 496 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 47 लाख 82 हजार 812  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 811 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता उद्योगधंदे व इतर सुविधांना लॉकडाऊनमधून मुभा देणार नसल्याचे दीपक म्हैसकर यांनी स्पष्ट केले. तसेच पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात 8 दिवस लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी व कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवारी) पुणे येथे दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.