Pune : पुणे विभागात बेघर-विस्थापित नागरिकांसाठी 214 निवारागृहांमध्ये 65 हजार विस्थापितांची सोय -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात बाहेर पडलेल्या कामगारांसह बेघर नागरिकांसाठी विभागात 214 निवारागृहे (शेल्टर होम) सुरु करण्यात आली आहेत. या निवारागृहात 64 हजार 926 नागरिकांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीत बेघर झालेले नागरिक, विस्थापित तसेच परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने अडकलेल्या व बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू करण्यात आली आहेत.

पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात 42 निवारागृहांमध्ये 12 हजार 460 नागरिक, सातारा जिल्ह्यात 143 निवारागृहांमध्ये 4 हजार 688 नागरिक, सांगली जिल्ह्यात 16 निवारागृहांमध्ये 1 हजार 306 नागरिक, सोलापूर जिल्ह्यात 2 निवारागृहांमध्ये 62 नागरिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात 11 निवारागृहांमध्ये 46 हजार 410 नागरिक असे एकूण 64 हजार 926 विस्थापित कामगार व बेघरांची व्यवस्था करण्यात आली आहे.

बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन, पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

जमावबंदी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगार व नागरिकांनी आहे त्याच ठिकाणी थांबून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारागृहात रहावे. आपल्या गावी अथवा परराज्यात जाण्यासाठी प्रवास करू नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.