Pune : जिल्ह्यात सरासरी 68 टक्के मतदान ; वाढीव मतदान कुणाच्या बाजूने ? युती की आघाडी ?

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 68 टक्के मतदान झाले. 2014 मध्ये 61 टक्केच मतदान झाले होते. यावर्षी मात्र त्यामध्ये 7 टक्क्याची वाढ झाली आहे. याचा फायदा काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी की भाजप – शिवसेना युतीला होणार ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. येत्या गुरुवारी (दि. 24) मतमोजणी होणार आहे.

इंदापूर तालुक्यात सर्वाधिक 75 टक्के मतदान झाले. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे. त्यांना राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी तगडे आव्हान दिले आहे. बारामती 68, जुन्नर 63, पुरंदर 64, दौंड 68, भोर 62, मावळ 72, आंबेगाव 68, शिरूर 67, खेड 67.4, असे एकूण जिल्ह्यात 68 टक्के मतदान झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मतदानाची टक्केवारी अधिक होती.

बारामतीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर असाच सामना रंगला. पुरंदरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप विरुद्ध माजी जलसंधारण मंत्री विजय शिवतारे, दौंडमध्ये आमदार राहुल कुल विरुद्ध राष्ट्रवादीचे रमेश थोरात, भोरमध्ये काँगेसचे संग्राम थोपटे विरुद्ध शिवसेनेचे कुलदीप कोंडे अशी थेट लढत झाली.

2014 मध्ये कोंडे यांनी थोपटे यांना विजय मिळविताना घाम फोडला होता. शिरूर तालुक्यात भाजपचे बाबुराव पाचर्णे विरुद्ध राष्ट्रवादीचे अशोक पवार ही लढत महत्वाची आहे. खेडमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनात दिलीप मोहिते पाटील यांनी तीव्र लढा दिला होता. त्याचा त्यांना या निवडणुकीत फायदा होणार असल्याची चर्चा आहे. मावळमध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.