Pune: शहराच्या मध्यवस्तीत एका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह 127 कर्मचारी होम क्वारंटाईन

पोलीस ठाण्यातील 8 कर्मचारी निघाले कोरोना पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज – पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील मध्यवस्तीत असलेल्या एक संपूर्ण पोलीस स्टेशनच क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये 117 कर्मचारी आणि 10 अधिकारी अशा 127 जणांचा समावेश आहे. काही दिवसांपासून या पोलीस स्टेशनमधील एकूण आठ कर्मचारी टप्प्याटप्प्याने कोरोना पॉझिटीव्ह सापडले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून येथील संपूर्ण स्टाफ होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे, मात्र पुणे शहर पोलिसांकडून अद्यापि या माहितीस अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

पुणे शहराच्या मध्यवस्तीत हे पोलीस ठाणे असून अत्यंत संक्रमणशील भागातील बंदोबस्ताची जबाबदारी येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आहे. हे कर्तव्य बजावत असताना पोलीस ठाण्यातील एकूण आठ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात पोलीस ठाण्यातील सर्व स्टाफ आलेला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. पोलीस ठाण्यातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी पर्यायी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर या वृत्तास दुजोरा दिला. या प्रकारामुळे संपूर्ण पोलीस खाते हादरून गेले आहे.

पुणे शहर कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र बनले आहे. त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे काही दिवसांपासून या पोलीस ठाण्यातील आठजणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅबचे नमुने गोळा करण्यात आले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. आठवड्यापूर्वी चाचणी घेण्यात आलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांना पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी संबंधित पोलीस ठाणे आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस चौकींना निर्जंतुकीकरण व स्वच्छतेसाठी सील करण्यात आले. पोलीस स्टेशन आणि चौकी सुमारे अर्धा दिवस बंद ठेवण्यात आले होते.

शहरातील नित्याचे काम आणि लॉकडाऊन बंदोबस्तासाठी अन्य पोलीस ठाण्याकडून मनुष्यबळ मागविण्यात आले आहे. पोलीस ठाण्याअंतर्गत कोरोना रेड झोन भागात तपासणी नाक्यांसाठी आणि बंदोबस्तासाठी पोलीस ठाण्याला पुरेसे मनुष्यबळ पुरविण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हद्दीतील बाजारपेठेची ठिकाणे, रुग्णालये, मोठ्या संख्येने जुने वाडे आणि चार झोपडपट्ट्यांचा समावेश रेड झोनमध्ये
करण्यात आला आहे.

कोरोनाबाधित तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मुंबईत मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे व आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश गृह मंत्रालयाकडून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पुण्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1217 झाली आहे. यातील 75 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. यातील 176 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. अजूनही 966 कोरोनाबाधित रुग्णांवर पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.