Pune : राजस्थानमधील माउंट अबूत अडकलेले 80 साधक पुण्यात पोहोचले सुखरूप

एमपीसी न्यूज – राजस्थानमधील माउंट अबू येथे प्रजापती ब्रह्मकुमारीचे अडकलेले 80 साधक सुखरूप पुण्यात दाखल झाले. पुण्यात आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तापसणी करून त्यांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. शासनाच्या पुढाकाराने देशाच्या विविध भागात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यात येत आहे.

प्रजापती ब्रह्मकुमारीचे 80 साधक लॉकडाऊनमुळे माउंट अबू, राजस्थान येथे अडकले होते. मागील काहो दिवसांपूर्वी सरकारने देशाच्या विविध भागात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळगावी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार या 80 साधक / अनुयायांना पुण्यात आणण्यात आले.

शनिवारी हे साधक पुण्यात डाझल झाले. त्यांनतर त्यांची जिल्हा रुग्णालय औंध येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी करण्यात आली.

या तपासणीमध्ये कोरोना (कोविड -19) संदर्भात कोणीही संशयित रूग्ण आढळून आलेले नाही, त्यामुळे त्यांच्या तळहाताच्या मागील बाजूस होम क्वारंटाईनचा शिक्का मारून, त्यांना घरी पाठवण्यात आले.

माऊंट अबू येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील साधकांना राज्यात परत आणण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात राज्य सरकारने देखील प्रवासासाठी परवानगी दिली.

या सर्वांची माऊंट अबू येथेही आरोग्य तपासणी करण्यात आली. पुणे येथील साधकांसाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली होती. सोशल डिस्टन्सिगचा अवलंब करून 80 साधकांना सुखरूप पुण्यात आणण्यात आले. त्यामुळे या साधकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.