Pune : शहरातील कोरोना बळींपैकी 85 टक्के पन्नाशी ओलांडलेले, 74 टक्के मृतांना इतरही जोखमीचे आजार

शहरातील कोरोनाबाधितांचे 70 टक्के मृत्यू ससून रुग्णालयात

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील एकूण 27 कोरोनाबाधित मृतांच्या माहितीचे विश्लेषण उपलब्ध झाले असून त्यानुसार वयाची पन्नाशी ओलांडलेल्यांचे प्रमाण 85 टक्के आहे. वयाची साठी ओलांडलेल्या मृतांचे प्रमाण 52 टक्के आहे तर 40 ते 50 वयोगटातील मृतांचे प्रमाण 33 टक्के आहे. वयाच्या चाळीशीच्या आतील एकाही रुग्णाचा मृतांमध्ये समावेश नाही. विशेष म्हणजे मृतांपैकी 74 टक्के रुग्णांना कोरोनाबरोबर जोखमीचे अन्य आजारही होते, अशी माहिती पुढे आली आहे.

पुणे शहरात आतापर्यंत एकूण 27 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 19 मृत्यू हे ससून सर्वोपचार रुग्णालयात झाले आहेत. हे प्रमाण 70 टक्के आहे. नोबेल रुग्णालयात दोन तर दीनानाथ रुग्णालय, सह्याद्री रुग्णालय, औंध जिल्हा रुग्णालय, इनामदार रुग्णालय, नायडू रुग्णालय या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांमध्ये पुणे शहरातील 26 तर पुणे ग्रामीणमधील एकाचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद नाही. मृतांमध्ये 14 पुरुष (52 टक्के) तर 13 महिलांचा (48 टक्के) समावेश आहे.

वरील विश्लेषणावरून कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी वयाची चाळीशी ओलांडलेल्या सर्वांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. वाढत्या वयाप्रमाणे कोरोनाचा धोकाही वाढण्याची शक्यता अधोरेखीत झाली आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार, श्वसनाचे विकार असे आजार असणाऱ्या रुग्णांनी कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याची आवश्यकतेवर डॉक्टरांनी भर दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.