Pune: शिवजयंती मिरवणुकीत 85 स्वराज्य रथ सहभागी होणार

एमपीसी न्यूज – शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने उद्या ( बुधवार) शिवजयंती उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या भव्य मिरवणुकीत हिंदवी स्वराजाचे सरसेनापती, सरदार आणि वीर माता यांचे तब्बल 85 स्वराज्य रथ सहभागी होणार आहेत. यामध्ये कोरेगाव ( जि. सातारा) येथील पराक्रमी बर्गे घराण्याचा स्वराज्य रथ सहभागी होणार असून, हा रथ मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याचा विश्वास श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यातील लालमहाल येथून सकाळी आठ वाजता सुप्रसिद्ध संगीतकार अजय -अतुल, महापौर मुरलीधर मोहोळ आणि सरदार घराण्याच्या प्रतिनिधींच्या हस्ते या मिरवणुकीला प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी अकरा वाजता एसएसपीएमएस शाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप होणार आहे.

समितीच्या ‘जिजाऊ मासाहेब शहाजी महाराज शिवज्योत’ या मुख्य स्वराज्य रथाच्या नेतृत्वाखाली सर्व स्वराज्य रथ मिरवणुकीत सहभागी होतील. दरम्यान, एसएसपीएमएस शाळेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर यंदा सलग नवव्या वर्षी ईशान अमित गायकवाड यांच्या हस्ते हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तसेच शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या 51 रणरागिणींचे पथकही या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरणार आहे.

या मिरवणुकीत यंदा प्रथमच कोरेगाव ( जि. सातारा) येथील पराक्रमी बर्गे घराण्याचा स्वराज्य रथ सहभागी होणार आहे. मिरवणुकीत या रथाचा 61 वा क्रमांक आहे. ‘राष्ट्रप्रथम’ या देशभक्तीवर आधारित रथात छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनरूड मूर्तीसह भारतमातेच्या मूर्तीचा समावेश आहे. या निमित्ताने पराक्रमी बर्गे घराण्याच्या इतिहासाला उजाळा मिळणार आहे. या सोहळ्यात कोरेगाव, पुणेसह राज्याच्या विविध भागात वास्तव्यास असलेली बर्गे मंडळी आवर्जून सहभागी होणार आहेत.

निवृत्त सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, सीआयडीच्या डीवायएसपी पल्लवी बर्गे, उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे आदींच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठनच्या वतीने रथाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.