Lonavala : कामशेत शहरात 87 लाखाचा गांजा जप्त; एकाला अटक, एकजण पसार

87 lakh cannabis seized in Kamshet city; One arrested, one passed : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कारवाई

एमपीसीन्यूज : कामशेत येथील पवनानगर रस्त्यावरील दौंडे काॅलनीमधील एका घरावर पुणे ग्रामीण पोलिसांनी मारलेल्या छाप्यात तब्बल 86 लाख 77 हजार 500 रुपये किंमतीचा 578. 500 किलो गांजा जप्त केल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली. आज, मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

संतोष रामचंद्र वाळुंज (रा. दौंडे काॅलनी, कामशेत, ता. मावळ ) व धनाजी विठ्ठल जिटे (रा. ताजे मावळ, सध्या रा. कामशेत) यांनी राहत्या घरात गांजाचा मोठ्या प्रमाणात बेकायदा साठा केला असल्याची गुप्त माहिती पुणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व कामशेतचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या पथकाने कामशेत येथील संतोष वाळुंज यांच्या घरावर छापा मारला.

त्यावेळी घरातील बैठकीच्या खोलीतील तळमजल्यात बेकायदा साठविलेला गांजाचा साठा मिळून आला. छाप्याची खबर लागताच संतोष वाळुंज याने पळ काढला, तर त्याचा साथीदार धनाजी जिटे याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी वाळुंज आणि जिटे या दोघांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पद्माकर घनवट यांनी दिली. पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे.

हा गांजा हा कोठून आणला तसेच तो कोठे पाठविण्यात येणार होता, यामागचा मास्टरमाईन्ड कोण आहे ? याचा शोध ग्रामीण पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, विजय पाटील, दत्तात्रय जगताप, प्रकाश वाघमारे, अजय दरेकर, महेंद्र वाळुंजकर, मुकुंद आयचित, राजेंद्र पुणेकर, रउफ इनामदार, गणेश महाडिक, संतोष शिंदे, संदीप शिंदे, हनुमंत माने, आशा कवटेकर, ए. एस. डोईफोडे, संतोष शिंदे, एस. एम. वाडेकर, ए. व्हि.पवार, नामदेव खैरे, राम जगताप, दत्तात्रय मोरे, दत्ता शिंदे, सचिन गायकवाड, समाधान नाईकनवरे व राधा नावाचे श्वान व श्वानपथक सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.