Pune : आठ दिवसांत वाढला 9 टीएमसी पाणीसाठा

पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट आता टळले आहे. : 9 TMC water storage increased in eight days

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात आठ दिवस दमदार पाऊस झाला. या कालावधीत तब्बल 9 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट आता टळले आहे.

या महिन्याच्या शेवटीही दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. सोमवारी ( दि. 3 ऑगस्ट) खडकवासला धरण क्षेत्रात केवळ 9.82 टीएमसी पाणीसाठा होता. आता 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी तब्बल 18.13टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर ओढ दिली. यंदा संबंध जुलै महिना कोरडा गेला. त्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट निश्चित मानले जात होते. मात्र, आता 9 टीएमसी पाणीसाठा वाढल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

आधीच कोरोनाच्या संकट काळात पाण्याचा वापर वाढला आहे. तर, गणेशोत्सव होइपर्यंत पाणीकपात होणार नसल्याचा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना दिला होता. त्यानंतर धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला.

सध्या खडकवासला साखळीतील चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. सध्या ही सर्व धरणे 62.21 टक्के भरली आहेत. 100 टक्के पाणीसाठा होण्यासाठी आणखी अशाच दमदार पावसाची गरज आहे.

पुणे महापालिका धरणातून महिन्याला साधारण दीड टीएमसी पाणी उचलते. वर्षाला पुणेकरांना सुमारे 18 टीएमसी पाणी लागते. आता 18 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा झाल्याने पुणेकरांची वर्षभराची चिंता मिटली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.