BNR-HDR-TOP-Mobile

Pune : शहरात यंदा दहीहंडी उत्सवात 983 मंडळे सहभागी होणार

एमपीसी न्यूज – दहीहंडी उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असताना पालिकेकडून केवळ सात मंडळांनी मंडप टाकण्याची परवानगी घेत असल्याचे समोर आले आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवात शहराच्या विविध भागातून जवळपास 983 मंडळे सहभागी होणार आहेत. त्यामुळे मंडळ मंडप परवानगी घेण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांच्याकडून विविध सण व उत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात येणार्‍या मंडपांसह रनींग कंपन आणि कमानींना परवानगी दिली जाते. पालिकेकडून मंडपाची परवानगी मोफत दिली जाते. मात्र, रनींग मंडप आणि कमानींवरील जाहीरातीच्या माध्यमातून मंडळांना उत्पन्न मिळत असल्याच्या कारणामुळे पालिका प्रशासनाकडून एका कमानीसाठी दिवसाला 100 रुपये आणि 100 फूट रनींग मंडपसाठी 100 रुपये व त्यापेक्षा जास्त लांबीसाठी दिवसाला 150 रुपये शुल्क आकारले जाते. गणेशोत्सवात ही प्रक्रीया मोठ्या प्रमाणात राबविली जाते.

दरम्यान, शहर व उपनगरांमध्ये उद्या (शनिवार) मोठ्या उत्साहामध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी विविध चौकांमध्ये, रस्त्यांवर मंडळांनी मोठ्या प्रमाणात फ्लेक्स बाजी करत मंडप, व्यासपीठ, कमानी आणि रनिंग मंडपाचे सांगाडे उभे केले आहेत. यापैकी बहुतांश ठिकाणी ही कामे पूर्णही झाली आहेत. पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहर व उपनगरांमध्ये जवळपास 983 मंडळांकडून यंदा दहीहंडी साजरी केली जाणार आहे. यामध्ये 73 मंडळे गर्दी खेचणारी आहे. या मंडळांची संख्या विश्रामबाग आणि चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत.

मंडप, व्यासपीठ, रनींग मंडप आणि कमानींसाठी पोलिस प्रशासनासह पालिका प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असताना शहरातील 983 मंडळांपैकी केवळ 7 मंडळांनी महापालिकेकडून मंडप व व्यासपीठासाठी परवानगी घेतलेली आहे. याशिवाय रनींग मंडपसाठी 3 आणि कमानीसाठी 1 मंडळाने पालिका प्रशासनाकडून परवानगी घेतल्याचे पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सांगितले आहे. परवानगी न घेणार्‍या मंडळांवर पालिका प्रशासन काय कारवाई करणार, या प्रश्नावर मात्र पालिका अधिकार्‍यांनी मौन बाळगले आहे.

.