Pune : पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या ‘त्या’ मुकादमाच्या घरी सापडले ‘घबाड’!

एमपीसी न्यूज – फुटपाथवरील नारळ विक्रेत्याकडून पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या ‘त्या’ मुकादमाच्या घरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) टाकलेल्या छाप्यात घबाड सापडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. रात्रभर पथक नोटा मोजत बसले होते. छाप्यात सुमारे 36 लाख रुपयांची रोकड आणि 7 तोळ्यांचे दागिने आढळले. एका मुकादमाच्या घरी इतकी रोकड सापडल्याने पोलीसही आवक झाले आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे.

सुनील रामप्रकाश शर्मा (वय 55) असे घरात घबाड सापडलेल्या मुकादमाचे नाव आहे.

शनिवारी मुकादमाने येरवडा भागातील एका नारळ विक्रेत्याकडे सुमारे एक हजार रुपयांची लाच मागितली होती. या करवाईत एसीबीने महापालिकेचा मुकादम शर्मा आणि खासगी व्यक्ती गोपी उबाळे (32) यांना पकडले होते. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सुनील शर्मा हे येरवडा क्षेत्रीय कार्यालयात मुकादम म्हणून नोकरीस आहेत. तर, उबाळे हा खासगी व्यक्ती असून तो बिगारी कामे करतो. नारळाच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी लाच घेतली होती. यानंतर एसीबीने शर्मा याच्या लोहगावमधील घरावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना घबाड सापडले. यात मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोन्याचे दागिने होते. तसेच छापा टाकलेल्या पथकाला रात्र जागून काढावी लागली.

याठिकाणी सुमारे 36 लाख रुपयांची रोकड आणि 7 तोळ्यांचे दागिने मिळाले आहेत. दागिने आणि रोकड जप्त करून ते येरवडा पोलीस ठाण्यात पहाटे जमा केले आहेत. दरम्यान, रोकड आणि दागिने मिळाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.