Pune: नवीन राहायला आलेल्या कुटुंबाला मेडिकल सर्टिफिकेट मागणाऱ्या हौसिंग सोसायटीवर गुन्हा दाखल

Pune: A case has been filed against a housing society seeking medical certificate from a newly arrived family वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक करून नागरिकांची गैरसोय केली व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशचे पालन न केल्याने कारवाई

एमपीसी न्यूज- ‘बीमारीसे लढो बीमार से नही’ हे वाक्य सरकारी यंत्रणांकडून वारंवार ऐकवलंय जातंय. रुग्णाशी वागताना भेदभाव करु नका, सोसायटीने त्यांना सापत्न वागणूक देऊ नये, असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर हौसिंग सोसायट्यांनी स्वतः कोणतेही नवे नियम-निर्बंध तयार करु नये, कोणावरही सक्ती करु नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. इतकेच काय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही वारंवार हेच आवाहन करतात. परंतु, यातून अनेक सोसायट्यांनी बोध घेतलेला दिसत नाही. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याबद्द्ल औंध येथील रोहन निलय हौसिंग सोसायटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोसायटीमध्ये नवीन राहायला आलेल्या कुटुंबाला वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय सोसायटीमध्ये प्रवेश करण्यास सोसायटी सचिवाने नकार दिला होता. त्यामुळे या सोसायटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याही सोसायट्यांनी स्वत:चे निर्बंध घातल्यास संबंधित सोसायटीवर दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येतील, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढले आहेत. यात मोलकरीण, घरकामगार तसेच वृत्तपत्र विक्रेते, अत्यावश्यक सेवेतील इलेक्ट्रिशियन, प्लंबर यांना प्रतिबंध करता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या संदर्भात तक्रारी प्रशासनाच्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून लोक करत आहेत. औंध येथील रोहन निलय सोसायटीने परस्पर सोसायटीत प्रवेश करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक करून नागरिकांची गैरसोय केली व जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे पालन केले नाही. यामुळे पुणे शहराच्या सहकारी संस्था उपनिबंधक स्नेहा जोशी यांनी संबधित सोसायटीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.