Pune : सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास जागेवरच एक हजार रुपयाचा दंड

A fine of one thousand rupees for spitting in a public place

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने प्रशासनातर्फे कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. यापुढे रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास संबंधितांवर जागेवरच एक हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. ही कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

दोन क्षेत्रीय कार्यालयासाठी एक पथक नेमण्यात येणार आहे. या पथकात तीन कर्मचारी असतील. एकूण 30 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही कडक कारवाई करण्यात येणार आहे.

याची अंमलबजावणी या आठवड्यापासून करण्यात येणार आहे, असे अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, सुगंधित सुपारी, तंबाखूची साठवण आणि विक्रीलाही बंदी आहे.

प्रशासनातर्फे वारंवार आवाहन करूनही मास्क न घालणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टनसिंगचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामध्ये काही प्रमाणात सूट दिल्यानंतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कोरोना आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई होणार असल्याने शहर स्वच्छ राखण्यास मदत होणार आहे.

उठसुठ कोणीही रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी पचकन थुंकत असल्याचे निदर्शनास येत असते. त्याला आता आळा बसण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.