Pune : अन् ‘नायडू रुग्णालया’च्या धोबी कर्मचाऱ्याला महापौरांकडून सुखद धक्का

'नायडू'त इंडस्ट्रीयल वॉशिंग मशीन दाखल; महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या निधीतून मागणी पूर्ण

एमपीसी न्यूज – सुरुवातीपासूनच ‘कोरोना’चे रुग्ण डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत. महापालिकेकडून सर्व यंत्रणा सज्ज करताना ‘नायडू’तील यंत्रणांवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे. याचाच अनुभव धोबी म्हणून काम करणाऱ्या संजय परदेशी यांना आला. परदेशी यांनी रुग्णालयातील कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनची मागणी केली. जी लॉकडाऊनच्या काळात महापौर मोहोळ यांनी पूर्ण केली असून इंडस्ट्रीयल वॉशिंग मशीन ‘नायडू’त दाखल झाले आहे.येत्या काही तासातच मशीन वापरात येणार आहे.

महापालिकेच्या सर्वच स्तरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी महापौर मोहोळ थेट संवाद ठेवत आहेत. जनता कर्फ्युवेळी आरोग्य सेवेतील व्यक्तिमत्वांना अभिवादन करण्यासाठी महापौर गेले असताना धोबी असलेल्या संजय परदेशी यांच्याशीही संवाद साधला. त्यावेळी कपडे धुण्यासाठी मशीन असावी, अशी अपेक्षा परदेशी यांनी बोलून दाखवली. त्यावर महापौर मोहोळ यांनी तातडीने दखल घेत मशीन खरेदीची प्रक्रीया सुरू केली आणि अवघ्या १५ दिवसांच्या आतच मशीन दाखल होऊन कार्यान्वित होत आहे.

याबाबत धोबी संजय परदेशी म्हणाले, ‘माझ्यासाठी हा सुखद धक्का आहे. मी स्वाईन फ्लूची साथ असतानाही रुग्णालयातील कपडे धुण्याचे काम करत होतो. कामाची भीती कधीही वाटली नाही मात्र मशीन असावी अशी इच्छा होती, जी महापौर मोहोळ यांच्याकडे बोलून दाखवली. त्यांनीही विषय मनावर घेऊन पूर्ण केला, याचे खूप समाधान आहे’.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘कोरोनावर मात करत असताना आपण सर्व घटकांचा विचार करत आहोत. परदेशी यांनी त्यांची अपेक्षा माझ्याकडे व्यक्त केल्यावर त्यासाठी महापौर निधीतून जवळपास ३ लाख ५० हजार रुपये उपलब्ध करुन दिले. परदेशी यांच्या चेहऱ्यावर मशीन दाखल झाल्यावर समाधान वाटले, हेच माझ्या कामाचा उत्साह वाढवणारे आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.