Pune : महिला डॉक्टरला मारहाण करणाऱ्या ‘त्या’ भाजप नगरसेविकेच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार

एमपीसी न्यूज- ससून रुग्णालयात महिला डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपच्या नगरसेविका आरती कोंढरे यांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर यांनी दिली आहे. भाजपच्या नगरसेविका आरती कोंढरे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी डॉ. स्नेहल अशोक खंडागळे (वय 26 रा. बी जे मेडिकल कॉलेज नर्सिंग हॉस्टेल, मूळ रा. जालना) यांनी फिर्याद दिली आहे.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (दि.12) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या आपत्कालीन सेवा विभागात डॉ. स्नेहल खंडागळे या एका गंभीर रुग्णावर उपचार करीत होत्या. त्याचवेळी नगरसेविका आरती कोंढरे या त्याठिकाणी आल्या आणि तेथील कॉटवर असलेल्या रुग्णाविषयी विचारणा करून आरडाओरडा करू लागल्या. त्यावेळी डॉ. स्नेहल यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता.

आरती कोंढरे यांनी वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. तसेच मोबाइलवर शूटिंग करण्यास सुरुवात केली. डॉ. स्नेहल यांनी त्यांना मनाई करून मोबाइलसमोर हात आडवा धरून शुटींग रोखण्याचा प्रयत्न केला असता आरती कोंढरे यांनी डॉ. स्नेहल यांच्या गालावर हाताने मारले, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

  • पोलीस आरती कोंढरे यांचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.