Pune: एक गृहिणी ते देशाची सुवर्णपदक विजेती पावरलिफ्टर…

एमपीसी न्यूज – सर्वसाधारणपणे एखाद्या गृहिणीचा दिनक्रम काय असू शकतो किंवा काय असतो, याची ढोबळ कल्पना सर्वांनाच असते. मात्र एखादी गृहिणी या दिनक्रमातूनही कोणते स्वप्न पाहू शकते व ते स्वप्न पूर्ण होण्यापर्यंतची तिची मेहनत पाहिली की स्तिमित व्हायला होते. असाच काहीसा पराक्रम पुण्यातील शुक्रवार पेठेतील नीता मेहता (वय ४२) या गृहिणीने केला आहे.

नीता मेहता यांनी आपल्या मेहनतीने व तीव्र इच्छाशक्तीने नुकत्याच कझाकस्तान देशातील अलमाटी या शहरात झालेल्या आशियन क्लासिक पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 262.5 किलोग्रॅम वजन उचलून भारतासाठी सुवर्णपदक मिळविले आहे. या क्रीडाप्रकारातील स्क्वाट प्रकारात त्यांनी 100 किग्रॅ, डेडलिफ्ट प्रकारात 115 किग्रॅ  आणि बेंचप्रेस प्रकारात 47.5 किग्रॅ एवढे वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. आता त्या पावरलिफ्टर म्हणून देश-विदेशातील विविध स्पर्धांमधून चमकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत.

आपल्या या यशाबद्दल बोलताना नीता म्हणाल्या की मी साधारणतः वयाच्या तिशीपासून व्यायामशाळेत नियमितपणे जाते. सातारा रोड परिसरातील गोल्ड जिममध्ये मी सराव करते. जिममधील माझे मार्गदर्शक ओमकार नेलेकर यांनी मला सर्वप्रथम या खेळाबाबत सांगितले व आपण योग्य मेहनतीने या खेळात सुवर्णपदकाला गवसणी घालू शकता, हा विश्वास निर्माण केला. सुमारे एक वर्षांच्या मेहनतीनंतर मलाही तो विश्वास वाटू लागला. माझी सातत्यपूर्ण कामगिरी पाहून इंडियन पावरलिफ्टिंग फेडरेशनने या स्पर्धेसाठी माझी निवड केली व पहिल्याच प्रयत्नात मी देशासाठी सुवर्णपदक खेचून आणले.

कुटुंबीयांची, पती दीपक मेहता, मुलांची मिळालेली साथ एखाद्या गृहिणीला यशोशिखरावर घेऊन जाते, याचेच हे उदाहरण. खेळाबाबत सांगताना नीता म्हणाल्या की पावरलिफ्टिंग व वेटलिफ्टिंग या दोन्ही खेळांत शैलीचा मूलभूत फरक आहे. दोन्ही खेळ तेवढेच कठीण आहेत. पावरलिफ्टिंगमध्ये बेंच प्रेस, स्वाट व डेडलिफ्ट असे प्रकार आहेत. हा खेळ खर्चिक तर होताच पण माझे सुदैव आहे की मला कोणत्याही आर्थिक अडचणी आल्या नाहीत.

स्त्रियांच्या मनातल्या महत्त्वाकांक्षांचा थांग प्रत्यक्ष ईश्वरालाही लागत नाही असे म्हणतात. मात्र विजिगीषु वृत्तीला त्याचाही आशीर्वाद कसा असतो, याचे हे मूर्तिमंत उदाहरण सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.