Pune : वारजे पुलाखाली परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी ; जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या परराज्यात जाण्यासाठी वारजे – माळवाडी, शिवणे, कर्वेनगर, उत्तमनगर परिसरातील शेकडो मजुरांनी सोमवारी सकाळी वारजे पुलाखाली गर्दी केली होती. या पुलाखाली आपल्या राज्यांत कसे जावे, यासंबंधीचे पत्रक लावण्यात आले होते. त्याची माहिती घेण्यासाठी परप्रांतीय मजुरांना तेथे गर्दी केली. गर्दी वाढल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

_MPC_DIR_MPU_II

पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर असल्याने परप्रांतीय मजुरांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आपापल्या राज्यात जायला मिळावे, यासाठी हे मजूर एकत्र आले. वारजे पुलाखाली मजूरअड्डा भरत असतो. त्याच ठिकाणी गर्दी होत असल्याने बहुधा आपल्याला गावी जायला मिळणार, ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे येथे जवळपास 500 मजूर जमले होते. परिस्थिती अवाक्या बाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना सौम्य लाठीमार करून पांगविले.

पुण्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने परप्रांतीय मजुरांनी आपल्या गावाच्या दिशेने जाण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, दुपार नंतर वारजे गावठाण येथील बराटे चाळीत परप्रांतीय मजुरांची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.