Pune: मोठी बातमी! शहरातील 69 कंटेनमेंट झोनची यादी जाहीर, 97 टक्के भाग कंटेनमेंट झोनमधून बाहेर

केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार शहरातील बहुतांश दुकाने सुरू होणार?

एमपीसी न्यूज – कोरोनाचा अतिसंक्रमणशील भाग असणाऱ्या 69 कंटेनमेंट झोनची नवी यादी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काल (रविवारी) रात्री जाहीर केली. यापूर्वी संपूर्ण पुणे शहर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले होते. शहरातील 330 चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी आता केवळ 10 चौरस किलोमीटरचे क्षेत्रच कंटेनमेंट झोन म्हणून राहणार आहे. म्हणजेच शहरातील 97 टक्के क्षेत्र कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात आल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार आता शहराच्या 97 टक्के भागातील दुकाने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 16,935 जणांची कोरोना निदान चाचणी झाली आहे. त्यातून पुणे शहरात एकूण 1,871 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 101 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 433 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन कंटेन्मेंट क्षेत्र कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका आयुक्त शेखऱ गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे शहरातील कंटेनमेंट झोनची हद्द कमी केल्याने 97 टक्के भागातील दुकाने आजपासून सुरू होऊ शकतील. यामध्ये दारुच्या दुकानांचाही समावेश आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधित क्षेत्राची अर्थात कंटेनमेंट झोनची हद्द कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

त्यासाठी महापालिकेने ज्या वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झालाय, त्या वस्त्याच सील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील 97 टक्के भागात राज्य आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दुकानं उघडली जाणार आहेत.

तब्बल 40 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे पुणेकर वैतागले असून यापुढे कोरोनाबरोबर जगण्याची मानसिकता बनवली आहे. लॉकडाऊन करूनही पुण्यातील कोरोनाची साथ नियंत्रित करण्यात यश न आल्याने आता कोरोनाच्या लढाईची युद्धनीती बदलण्याची भूमिका प्रशासनानेही घेतली असल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.