Pune : एहसास, ए म्युझिकल जर्नीतून साकारला वादन गायन आणि नृत्याचा अनोखा संगम

एमपीसी न्यूज- ‘पंचतुंड नररुंडमालधर’ नांदीने सुरू झालेला आणि उत्तरोत्तर मंत्रमुग्ध करत जाणाऱ्या सुरेल सांगितिक प्रवासात रसिकांनी वादन, गायन आणि नृत्याचा अनोखा संगम अनुभवला. एकाहून एक सरस काव्य, गजल आणि गाणी, विविध वाद्यांचे वादन, मोहक नृत्याविष्कार​ एकाच रंगमंचावर साकार झाले. पुण्यातील यश सोमण हा तबला वादक असून त्याच्या संकल्पनेतून शुभंकर भागवत, देविका चित्ते, इशा कुलकर्णी, प्रज्ञा देसाई शेवडे, सौरभ करमरकर, अन्वय अहेर आणि स्वतः यश सोमण या युवा कलाकारांनी एकत्र येऊन नुकताच ‘एहसास, ए म्युझिकल जर्नी’ हा कार्यक्रम सुदर्शन रंगमंच येथे सादर केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचतुंड नररुंडमालधर या नांदी वर देविका चित्ते आणि ईशा कुलकर्णी यांनी कत्थक नृत्य सादर केले. त्यानंतर यश सोमण यांनी स्वरबध्द केलेली कारीकारी रैना.. ही रचना आणि शुभंकर भागवत याची जुस्तजू या रचना सादर झाल्या. मै वारी जाऊं.. या यशच्या स्वरबध्द केलेल्या रचनेवर ईशाने अप्रतिम नृत्य तसेच कृष्णलीलातून उत्कृष्ट अभिनय सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

शुभंकर याने स्वरबध्द केलेल्या बरबादिया.. या रचनेवर देविका हिने गाणे सादर केले. या गाण्याला यश याने ‘काहोन’ हे ताल वाद्य वाजवून विशिष्ट पाश्चिमात्य संगीताचा साज चढवला. यानंतर प्रज्ञा देसाई शेवडे हिचे ‘काँकरिंग मुडस’ अंतर्गत व्हायोलिन वादन झाले. शुभंकर याने स्वरबध्द व शब्दबद्ध केलेल्या शायद वो तुम हो.. ही अतिशय सुरेल रचना नवोदित गायक सौरभ करमरकर याने सादर केली ज्याला प्रेक्षकांची वाहवा मिळाली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अन्वय अहेर याने लीड गीटार वर चलो हम साथ चले.. आणि कोई दिवाना केहेता है.. या हलक्या फुलक्या पण उडत्या चालीच्या रचना सादर केल्या. यातील कोई दीवाना या.. रचनेला उदयोन्मुख कलाकार सेजल नातू हिने गद्य काव्याची जोड देऊन रंगत आणली. कार्यक्रमाच्या​ अंतिम टप्प्यात शुभंकर याची रिश्ता ही रचना सर्वांच्या मनाला भावली आणि यशच्या ‘लोकल ट्रेन’ या लोकलचा चढता वेग या संकल्पनेवर आधारित अनोख्या रचनेवर गायन वादन आणि नृत्य सादर करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. ज्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. कार्यक्रमाचे निवेदन सेजल नातू हिने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.