Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूककोंडीचा प्रश्न तातडीने सोडवा; अन्यथा 23 जानेवारीला करणार रस्ता रोको आंदोलन

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वारजे येथील वाहतूककोंडीचा प्रश्न तातडीने सोडवा. अन्यथा, वारजे विकास कृती समितीतर्फे गुरुवारी (दि. 23 जानेवारी) रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त कार्यालय, वारजे पोलिस स्टेशनला यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रविण दुधाने, सामाजिक कार्यकर्ते बाबा खान, गणेश गोकुळे, के.डी.पवार यावेळी उपस्थित होते.

काकडेसिटी ते वारजे – माळवाडी पर्यंत वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. आंबेडकर चौकात एकूण सहा ठिकाणी रस्ते एकत्र येतात. वारजे हायवेवरून आंबेडकर चौकातून उलट दिशेने येणारा रस्ता, त्या जवळून जाणारा रस्ता, कॅनॉल रोड, शानुपटेल शाळेकडे जाणारा रस्ता, तिरुपती नगरला जाणारा रस्ता, दुधाने वस्तीकडे जाणारा रस्ता आणि गलींदे रस्ता आहे.

या रस्त्याच्या वाहतुकीचा विचार करता आंबेडकर चौकातून पुर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चहू बाजूला मोठ्या प्रमाणात विशेषतः सकाळ आणि संध्याकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याच चौकातून शानुपटेल, ट्री हाऊस शाळा, बॉम्बे केम्ब्रिज स्कूलमधील मुलांना शाळेत जाणे – येणे धोकादायक झालेले आहे.

या समस्येची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा गुरुवारी (दि. 23 जानेवारी) सकाळी 10 वाजता आंबेडकर चौक वारजे नाका येथे वाहतूककोंडीच्या समस्ये विरुद्ध आंदोलन करण्यात येणार आहे. तर, कर्वेनगरहुन वारजे – माळवाडीकडे येणारी चार ते पाच सिग्नल यंत्रणा मागील दोन वर्षांपासून बंद आहे. ही बंद सिग्नल यंत्रणा का बसवली, असा सवाल प्रवीण दुधाने यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.