Pune: अंदाजपत्रकात 25 टक्के कपातीचा प्रस्ताव दप्तरी दाखल करा – आबा बागूल

सध्या परिस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य सभेच्या कामकाजाबाबतची कार्यवाही होणे अडचणीचे आहे. हा प्रस्ताव धोरणात्मक बाब असल्याने पक्षनेत्यांच्या बैठकीत त्यावर निर्णय घेणे आवश्यक आहे, असे बागूल यांनी म्हटले आहे.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचा सन 2020 – 21 चा अर्थसंकल्प हा मुख्य सभेने मान्य केलेला आहे. सध्या परिस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य सभेच्या कामकाजाबाबतची कार्यवाही होणे अडचणीचे आहे. हा प्रस्ताव धोरणात्मक बाब असल्याने पक्षनेत्यांच्या बैठकीत त्यावर निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी केली आहे.

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना यासंदर्भातील पत्र देण्यात आले आहे. नगरसचिव पुणे महापालिका यांच्यामार्फत आयुक्तांनी 2019 – 2020 या आर्थिक वर्षामधील प्रलंबित देयके अदा करण्यासाठी आणि कोव्हीड 19 च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने 2020 – 21 च्या मान्य अंदाजपत्रकीय तरतुदीमधील भांडवली ‘स’ यादी पैकी सरसकट 25 टक्के कपात करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सादर केलेला आहे.

सन 2020-21 चे आर्थिक वर्ष सुरू होवून 3 महिने पूर्ण होत आहेत. सदयस्थितीत चालू आर्थिक वर्ष संपण्यास आणखी 9 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. तरी या  प्रस्तावावर आणखी 3 महिन्यानंतर तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा. काही सभासदाना ‘स’ यादीद्वारे दोन कोटीपेक्षा देखील कमी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर काही सभासदांना पाच कोटी अथवा त्यापेक्षा जास्त देखील तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे बागूल यांनी म्हटले आहे.

यामधील विषमतेचा विचार करता अशा प्रकारच्या कपातीचा निर्णय हा कमी तरतूद असलेल्या सभासदांकरिता निश्चितच अन्यायकारक आहे. तथापि, कपात लागू करावयाची असल्यास ज्या सभासदांना 2 कोटी पेक्षा जास्त तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदयस्थितीत फक्त 15 टक्क्यांनी कपात करण्यात यावी. अशा प्रकारच्या कपातीचा निर्णय लागू करावयाचा असल्यास मुख्य खात्याकडील दोन कोटी अथवा त्यापेक्षा जास्त तरतूद असलेल्या भांडवली कामांकरिताच लागू करण्यात यावा, असेही बागूल यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like