Pune : लाकडामधून अप्रतिम शिल्प घडवणारा ज्येष्ठ अवलिया

एमपीसी न्यूज- नोकरीमधून निवृत्त झाल्यानंतर काही दिवस जबाबदारीमधून मुक्त झाल्याचा आनंद माणसाला काही काळच मिळतो. काही दिवसानंतर मोकळा वेळ खायला उठतो. या वेळेचं करायचं काय ? हे सुचत नाही. अशावेळी आपल्या अंगात असलेले कलागुण उपयोगाला येतात. 80 वर्षाचे श्रीपाद चिलकवाड ही अशीच एक कलासक्त व्यक्ती आहे, ज्यांनी नोकरीमध्ये असतानाच आपल्यामधील चित्रकलेला वाव देता देता लाकडी शिल्पे घडवण्याची कला आत्मसात केली. आज निवृत्तीनंतर देखील जवळपास ३० वर्षे ते या कलेमध्ये आपला वेळ व्यतीत करतात.

चिलकवाड यांचे लहानपण हुबळी येथे गेले. एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्यामुळे चित्रकला शिक्षकांच्या आग्रहावरून त्यांनी चित्रकलेच्या दोन परीक्षा दिल्या. चित्रकला शिक्षकांचे ते आवडते विद्यार्थी होते. सन1957 मध्ये इयत्ता अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्याच्या इंजिनीरिंग कॉलेजमध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनीरिंगसाठी प्रवेश घेतला. पुण्यात बहिणीचे घर होते. त्यांच्या घरी राहून शिक्षण सुरु झाले. त्यावेळी पुणे एक शांत आणि आल्हाददायक हवा असलेले शहर होते. पुण्यात माणसांची एवढी गर्दी झालेली नव्हती. पुढे बहिणीच्या यजमानांची बदली सांगलीला झाली आणि ते पुण्यात एकटे राहू लागले.

त्यावेळी चित्रकला शिकणारे काही विद्यार्थी अलका टॉकीजच्या मागे नदीकिनारी बसून रेखाटन करताना चिलकवाड यांनी पहिले. त्यांच्याही मनात पुन्हा चित्रकलेने उभारी घेतली. ते देखील त्यांच्याबरोबर चित्रे रंगवू लागले. पुढे इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आणि नोकरीचा शोध सुरु झाला. दरम्यानच्या काळात एक अनपेक्षित घटना घडली. 12 जुलै 1961 रोजी पानशेत धरण फुटून पुण्यात जलप्रलय आला. निम्मे पुणे पाण्यात बुडाले. नदी किनारी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले. या घटनेमध्ये चिलकवाड यांच्या खोलीत पाणी शिरून त्या गाळामध्ये सगळी चित्रे खराब झाली. पुरानंतर श्रीपाद चिलकवाड यांच्या वडिलांनी त्यांना हुबळीला परत बोलावून घेतले. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी नोकरीचा प्रयत्न, मुलाखती असे सत्र सुरु होतेच. पुढे डिसेंबर महिन्यात पुन्हा पुण्यात आले. पुण्यात पुरामध्ये वाचलेले घर आवरून तिथे राहायला सुरुवात केली. नंतर पुण्याच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदवले. काही दिवसातच त्यांना नोकरीचा कॉल आला. आणि मुलाखतीचे सोपस्कार पार पडून ते लष्करच्या एका विभागातील सरकारी नोकरीमध्ये रुजू झाले.

नोकरीच्या काळात देखील त्यांचे चित्रकलेवरचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही. नोकरीमधून वेळ मिळेल तसा चित्रकलेचा सराव चालू होता. पुढे त्यांचा विवाह झाला. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना देखील त्यांचे कलासक्त मन शांत बसले नव्हते. अचानक त्यांच्या कलासक्त जीवनाला एका घटनेमुळे कलाटणी मिळाली. ऑफिसमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येकाला आपल्यामधील कलागुण सादर करण्याची संधी मिळाली. चिलकवाड यांनी अर्थातच काही चित्रे काढली. त्याचवेळी त्यांच्या ऑफिसमधील एक सहकारी व्यक्ती मुल्ला यांना खडूमधून अप्रतिम शिल्प घडवताना पहिले. त्या निमुळत्या लहान आकाराच्या खडूमधून त्या सहकाऱ्याने एकापेक्षा एक कलाकृती साकारल्या होत्या. ते पाहून श्रीपाद चिलकवाड प्रभावित झाले.

त्यांनी प्रथमच खडूमधून ऑस्कर अवॉर्डची बाहुली हुबेहूब साकारली. त्यातून कोरीवकाम आपल्याला जमते असा आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला. चिलकवाड यांचे बहुतांश काम हे ऑफिसमध्ये बसून लिखापढीचे असायचे. त्याचा त्यांना कंटाळा यायचा. तांत्रिक शिक्षण घेण्याची प्रचंड आवड असल्यामुळे जेवणाच्या सुट्टीत किंवा फावल्यावेळात त्यांनी वर्कशॉपमध्ये अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने जाऊन तंत्र शिक्षण आत्मसात केले. कोणत्याही प्रकारचे ज्ञान आत्मसात करताना समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा पदाने, वयाने लहान असली तरीही त्याच्याकडून शिकण्यासारखे खूप काही असते असे चिलकवाड मानतात. स्वतःजवळ नम्रता असली, शिकण्याची आस असली की समोरची व्यक्ती देखील आपल्याला शिकवण्यासाठी पुढे येते.

या सर्व तांत्रिक ज्ञानाचा त्यांना पुढे लाकडामध्ये कोरीवकाम करताना खूप उपयोग झाला. नोकरीची वेळ संपली की पुण्याच्या टिम्बर मार्केटमध्ये लाकडांच्या तुकड्यांचा शोध घ्यायचा. जुनी घरे पाडली की त्या घराच्या तुळया, दरवाजाच्या चौकटी टिम्बर मार्केट मध्ये येत असत. त्यातील काही लाकडी वस्तुंची पुन्हा थोडीशी डागडुजी करून त्या विकल्या जात असत. त्यातूनही निरुपयोगी असलेले लाकडाचे तुकडे घरी आणून त्यावर श्रीपाद चिलकवाड कलाकृती साकारण्याचे काम करायचे. आजपर्यंत त्यांच्या संग्रहात अनेक उत्तमोत्तम कलाकृती आहेत. त्या इतक्या आहेत की त्या कुठे ठेवायच्या का प्रश्न निर्माण झाला आहे.

अनेकजण त्यांना या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यास सांगतात. पण चिलकवाड म्हणतात, “प्रदर्शन भरवून या कलाकृती मला विकून त्यामधून पैसा कमवायचा नाही. या सर्व कलाकृती मी माझ्या आनंदासाठी तयार केल्या आहेत. या कलाकृती साकारत असताना अनेक नवनवीन कल्पना माझ्या डोक्यात आल्या. त्यातून काहीतरी नवे देण्याचा मी प्रयत्न करतो. खूप काही शिकायला मिळत. सर्वात महत्वाचे म्हणजे माझा निवृत्तीनंतरचा काळ मोठ्या मजेत जातो. कलाकृतींच्या माध्यमातून अनेक ओळखी होतात. हेच या कलाकृतींमधून मी प्राप्त केले आहे. जगण्यासाठी पुरेसा पैसा असताना त्याच्या मागे उगाच कशाला धावू ?”

औपचारिक शिक्षण नसले तरीही आपण आपल्या जिद्दीने बरेच काही साध्य करू शकतो, आपल्या अपयशाचे खापर उगाच परिस्थिती वर किंवा नशिबावर फोडून काही होत नाही, मोबाइल फोन आणि इंटरनेट नव्हते त्यावेळी माझा हा आनंद माझ्यापर्यंतच सीमित होता. पण आज फेसबुक, व्हाट्स अँपच्या माध्यमातून माझी कला अनेकांपर्यंत पोचली. आवड असलेल्या लोकांची साथ मिळू लागली. त्यांच्याकडून कौतुक होऊ लागले आणि काम करण्याला हुरूप येऊन माझा वेळ छान जाऊ लागला. उतारवयातील एकलकोंडेपणावर हा एक रामबाण उपाय वाटू लागला. शिवाय तब्येत ठणठणीत राहते. म्हणूनच माझे प्रत्येक ज्येष्ठांना आवाहन आहे की त्यांनी एखादी कला जोपासण्याचा प्रयत्न करावा ”

वयाच्या 80 व्या वर्षातही चिलकवाड स्वतःला एकदम फिट आणि उत्साही ठेवतात. त्यामुळे निवृत्तीनंतर काय करायचे हा प्रश्न त्यांना कधीच पडला नाही. या उलट असलेला वेळ देखील कमी पडतो असे ते म्हणतात.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.