Pune : कोरोना लढ्यासाठी भारतीय जैन संघटना आणि युनानी मेडिकल कॉलेजकडून 5 रुग्णवाहिकांचे सुसज्ज पथक

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी गरजुंना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि आझम कॅम्पस मधीलझेड.व्ही.एम.युनानी मेडिकल कॉलेजने पुढाकार घेतला आहे. यासाठी या दोन्ही संस्थांच्या वतीने 5 रुग्णवाहिकांचे सुसज्ज पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या वैद्यकीय पथकात 25 डॉक्टर्स आणि 5 सुसज्ज रुग्णवाहिका आहेत. 15  एप्रिलपासून या पथकाने कामास सुरुवात केली आहे. पुणे कॅम्प येथील आझम कॅम्पस येथे असलेल्या युनानी महाविद्यालयात या पथकाला कामाच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी डॉ. पी. ए. इनामदार,अबेदा इनामदार, डॉ. मुश्ताक मुकादम, डॉ. नाझीम शेख, प्राचार्य जलिस शॆख उपस्थित होते. या पथकाचे नेतृत्व डॉ. मुश्ताक मुकादम यांच्याकडे आहे. युनानी महाविद्यालयाच्या आणखी आजी, माजी पदव्युत्तर विद्यार्थ्यानी या कोरोना विरोधी मोहिमेत सहभागी व्हावे,असे आवाहन डॉ. इनामदार यांनी केले आहे. शासकीय यंत्रणेशी समन्वय करून हे पथक सर्व आपत्कालीन वैद्यकीय सेवा, तपासण्या, उपचारांसाठी कार्यरत राहणार आहे,असे त्यांनी सांगितले.

15 आणि 16 एप्रिल रोजी येरवडा, भीमनगर, कोंढवा, शिवनेरीनगर या भागात या पथकाने वैद्यकीय सेवा दिली. शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनखाली भारतीय जैन संघटना आणि झेड. व्ही. एम. युनानी मेडिकल कॉलेजचा हा संयुक्त प्रकल्प आहे. या आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी डॉ. मुश्ताक मुकादम यांच्याशी 9922404536 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.