Pune : शिधापत्रिकाधारकांची डाळ वाटपाबाबत फसवणूक -आम आदमी पार्टीचा आरोप

एमपीसीन्यूज – शिधापत्रिकाधारकांची फसवणूक थांबवून राज्य सरकारने एप्रिल आणि मे महिन्याची डाळ एकत्र द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रवक्ते आणि पुणे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केली आहे. कोरोनाकाळात निदान सरकारने तरी गरीबांची फसवणूक करु नये असे मत किर्दत यांनी व्यक्त केले.

याबाबत त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, केंद्र सरकार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत माणसी पाच किलो गहू, तांदूळ आणि प्रति कार्ड एक किलो डाळ देऊ असे केंद्र सरकारने २६ मार्च रोजी सांगितले होते. यानुसार एप्रिल, मे, जून या तीन महीन्यांसाठी मोफत धान्य देण्याचे आदेश काढले.

प्रत्यक्षात त्यानंतर २० दिवसांनी महाराष्ट्रात फक्त मोफत तांदूळ वाटप सुरु झाले. डाळ वाटप झाले नाही. त्याबाबत जनतेने आवाज उठवल्यावर केंद्र सरकारकडून डाळ आलीच नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र सरकारला एप्रिल महिन्यात केंद्र सरकारच्या पंतप्रधान योजनेतून डाळ मिळालीच नाही म्हणजे केंद्र सरकारने फसवणूक केली.

आता मे महिन्यात केंद्र सरकारकडून राज्य सरकारला डाळ मिळाली आहे पण त्याचे वाटपच अजून झालेले नाही. मात्र काही दुकानांमध्ये डाळीची अंशतः उचल झाल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात दुकानदारांनी या धान्याचे वाटप केलेलेच नाही.

तरीही, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ ट्विटरद्वारे सांगत आहेत की, सुमारे ५१ लाख शिधापत्रिकाधारकांना ११लाख २५ हजार क्विंटल तांदूळ, आणि १४ हजार ९७ क्विंटल डाळीचे वाटप केले. ही गरीब जनतेची शुद्ध फसवणूक आहे. असे किर्दत यांनी पत्रकात म्हटले आहे.

दुकानदारांनी डाळीचे वाटप केले नसल्याचे पुरावे किर्दत यांनी प्रसिद्धीपत्रकासोबत जोडले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.