Pune: रेशनमधील भ्रष्टाचार थांबवावा, आम आदमी पार्टीची मागणी

एमपीसी न्यूज – रेशनमधील भ्रष्टाचाराच्या संदर्भात आम आदमी पार्टी आणि आम आदमी रिक्षा संघटनेने पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) यांच्याकडे तक्रारी केल्या असून रेशनमधील भ्रष्टाचार थांबवावा, अशी मागणी केली आहे.

आम आदमी पार्टीचे पदाधिकारी श्रीकांत आचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात फक्त पाच कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. तेव्हा असे निदर्शनास आले की, या पाच कुटुंबांना शिधा पत्रिकेवर निर्धारित केलेल्यापेक्षा एक्कावन्न किलो गहू आणि एक्केचाळीस किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून कमी दिला गेला. पुणे जिल्ह्यातील सर्व कुटुंबांचा विचार केला गेला तर, या भ्रष्टाचाराचे रौद्र स्वरूप समोर येते.

दुकानदार आणि सरकारी आधिकारी संगनमतातून भ्रष्टाचार करतात हे उघड आहे. मुख्यमंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले असून त्यात रेशन दुकानदाराचे नांव आणि कमी धान्य मिळालेल्याचे नांव याचा तपशील दिला आहे, असे आचार्य यांनी म्हटले आहे.

रेशनवर धान्य खरेदी करताना पिवळ्या व केशरी कार्डधारकांनी सतर्क रहावे आणि शंका असल्यास आम आदमी पार्टी रिक्षा संघटना अथवा आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांशी संपर्क करावा, असे आवाहन आचार्य यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.