Pune Accident News: उड्डाणपुलावरून 50 फूट खाली कोसळली मोटार, तरीही ‘त्या’ स्वतःहून गाडीतून उतरून आल्या बाहेर!

देव तारी त्याला कोण मारी? भीषण अपघातातून सुखरूप बचावल्या महिला डॉक्टर!

0

एमपीसी न्यूज – कात्रज-देहूरोड बाह्यवळण रस्त्यावरील वडगाव उड्डाणपुलावरून मोटार 50 फूट खाली कोसळूनही मोटार चालविणाऱ्या महिला डॉक्टर सुखरूप बचावल्याची घटना नुकतीच घडली. एवढ्या उंचावरून मोटार कोसळल्यानंतरही या 62 वर्षीय महिला डॉक्टर स्वतःहून गाडीतून उतरून बाहेर आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची प्रचिती या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा आली.

डॉ. छाया शहाजी देशमुख ( वय 62, रा. भाग्यश्री अपार्टमेंट, आयटीआय रोड, औंध) असे या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

डॉ. देशमुख या त्यांच्या मोटारीतून (एमएच 12, एफयू 2283) भारती रुग्णालयातून औंधला घरी जात असताना हा अपघात झाला. वडगाव उड्डाणपूल संपत असताना  त्यांच्या लेनमधील एका मोठ्या ट्रेलरचा टायर फुटला आणि त्यांची धडक डॉ. देशमुख यांच्या मोटारीला बसली. त्यामुळे त्यांचे नियंत्रण सुटले आणि बाजूचे लोखंडी कठडे तोडून त्यांची मोटार पुलावरून सुमारे 50 फूट खाली कोसळली. मंगळवारी (15 सप्टेंबरला) दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. 

सुमारे 50 फूट खाली गाडी कोसळूनही डॉ. देशमुख किरकोळ जखम झाल्या. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या धक्क्याने सावरत त्या स्वतः गाडीतून उतरून बाहेर आल्या. त्यानंतर जवळ असलेल्या वाहतूक विभागातील पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

सिंहगड पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.