Pune Accident News : नवले ब्रिजजवळील अपघातात एक ठार; 8 वाहनांचे जबर नुकसान

एमपीसीन्यूज : भरधाव वेगातील टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे-बंगळूर महामार्गावरील नवले ब्रिजजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. नियंत्रण सुटल्याने त्या टेम्पोने सात ते आठ वाहनांना धडक दिली होती. यामध्ये कारमधील एका व्यक्तीचा जखमी झाल्याने मृत्यू झाला.

विद्याधर शंकर साळुंके (वय 68) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर ह्या अपघातात अमजद खान (वय 45) नावाचा आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे.

अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला, तर क्लीनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, अपघातग्रस्त टेम्पो हा दिव दमनचा आहे. भाजीपाला घेऊन हा टेम्पो मुंबईच्या दिशेने निघाला होता. आज सकाळच्या सुमारास कात्रजचा नवीन बोगदा ओलांडल्यानंतर मुंबईच्या दिशेने जात असताना तीव्र उतारावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर या टेम्पोने तीन रिक्षा आणि चार चारचाकी वाहनांना जोराची धडक दिली.

यामध्ये विद्याधर साळुंखे यांची देखील कार होती. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने साळुंखे यांना आणि अमजद खान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान साळुंखे यांचा मृत्यू झाला.

यातील मयत साळुंखे हे स्कूल व्हॅनवर चालक आहेत. सहकार नगर परिसरात ते कुटुंबीयांसह राहतात. मित्रांना भेटण्यासाठी आज सकाळी ते कार घेऊन निघाले होते. या दरम्यान हा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, सिंहगडचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.