Pune Accident : मुंबई – बंगळूर महामार्गावर ट्रेलर उलटला, चालकासह दोघांची फायर ब्रिगेडकडून सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज : मुंबई बंगळूर महामार्गावरील (Pune Accident) दरीपुलाजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा अपघात झाला. साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने येणारा एक मोठा ट्रेलर अपघात ग्रस्त होऊन जागेवरच पलटी झाला. या अपघातानंतर ट्रकचा चालक जखमी अवस्थेत ट्रकमध्ये अडकला होता. मात्र, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या ट्रक चालकाची सुखरूप सुटका केली.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, मोठा ट्रेलर पलटी होऊन पुढील केबिनमधे सीटवर चालक जखमी अवस्थेत अडकला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून त्या चालकाशी संवाद साधून धीर देत जवान शिवाजी मुजूमले व शिवाजी आटोळे यांनी तातडीने दलाकडील स्प्रेडर व कटर हे उपकरण वापरत तसेच एका क्रेनच्या मदतीने जखमी चालकाला पंधरा मिनिटात जखमी अवस्थेत बाहेर काढून लगेच उपचाराकरिता रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले.

परंतु, रस्त्यावर पलटी झालेला ट्रेलर पाहून एक दुचाकीस्वार रस्त्यावरून जात असताना त्याने प्रथमदर्शनी प्रत्यक्ष हा अपघात पाहून मदतीकरिता पुढे आला असता त्या ट्रेलरने काही प्रमाणात पेट घेत असल्याचे पाहताच सदर दुचाकीस्वाराने घाबरुन स्वत:चा बचाव करण्याकरिता दरीपुलावरुन खाली उडी मारली होती. नंतर काही वेळाने त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यावर दलाचे जवान व तेथे उपस्थित नागरिक यांच्या मदतीने त्या (Pune Accident) दुचाकीस्वारासही जखमी अवस्थेत वर काढण्यात आले.

ट्रेलर क्रमांक एम एच 46 – 2950 असा असून अपघाताचे नेमके कारण व दोन्ही जखमींची नावे समजू शकली नाहीत. या अपघातामुळे रस्त्यावर वाहनातील तेल पडल्याने इतर वाहने घसरुन पडण्याची शक्यता असल्याने जवानांनी त्या ठिकाणी माती टाकून धोका दुर केला आहे. या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर व वाहनचालक ज्ञानेश्वर बाठे तसेच तांडेल – शिवाजी मुजूमले व फायरमन शिवाजी आटोळे आणि मदतनीस दिगंबर वनवे, कल्पेश बानगुडे, राजेंद्र भिलारे यांनी सहभाग घेतला. तसेच पीएमआरडीए अग्निशमन दल यांचे जवान ही मदतीकरिता दाखल झाले होते. पोलिस विभाग व उपस्थित असणारे नागरिक यांची ही मदत झाली.

Pune Police : ‘चलो बैठो घुमने जाते है’ म्हणत तरुणींची छेड काढणाऱ्यांना पोलिसांनी घडवली जन्माची अद्दल, वाचा काय केलं?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.