Pune : अतिक्रमण विभागाकडून अधिकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई; पथारी व्यावसायिक पंचायत संघटनेचा आरोप

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अधिकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई होत असल्याचा आरोप पथारी व्यवसायिक पंचायत महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे करण्यात आला आहे. दि. 30 जानेवारी 2020 रोजी पुणे शहरातील व्यावसायिकांवर होत असलेल्या पोलीस कारवाईच्याबाबत संघटनेतर्फे आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. आपण अतिक्रमण विभागाला पोलिसांची कारवाई थांबविण्याचे आदेश दिले होते. तरीही कारवाई सुरूच असल्याचा आरोप संघटनेतर्फे महापालिका आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

या अधिकाऱ्यांना कारवाईचे कारण विचारले असता, महापालिकेचे भाडे भरले आहे का नाही, किंवा इतर कोणतेही कारण काढून कारवाई केली जात आहे. परंतु, अतिक्रमण खाते पुणे महापालिकेमार्फत अधिकृत पथारी व्यवसायिकांना प्रमाणपत्र दिलेले असतानाही महापालिका व पोलीस प्रशासन जाणूनबुजून कारवाई करीत आहे. ही पुणे महापालिकेने पथारी व्यावसायिकांची केलेली सरळसरळ फसवणूक असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

शहरातील लक्ष्मी रोड, जे. एम. रोड, एफ. सी. रोड, सातारा रोड, आशा 11 रस्त्यांवर पथारी व्यवसायिकांना व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे काम पोलीस प्रशासनाने कायद्याला डावलून हातात घेतल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यातून आयुक्तांनी मार्ग काढावा, अशी मागणी सरचिटणीस बाळासाहेब मोरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.