Pune : खंडणीप्रकरणात अभिनेत्री सारा श्रवणला अटक; एका अभिनेत्याविरुद्ध विनयभंगाची खोटी तक्रार मागे घेण्यासाठी मागितली खंडणी

एमपीसी न्यूज – ‘रोल नंबर १८’ या चित्रपटातील अभिनेत्याविरुद्ध कटकारस्थान करून विनयभंगाची खोटी तक्रार देऊन ती मागे घेन्यासाठी खंडणी उकळल्या प्रकरणात अभिनेत्री सारा श्रवण ऊर्फ सारा गणेश सोनवणे (वय 32, रा. सध्या दुबई, मूळ रा. मुंबई) हीला गुन्हे शाखा यूनिट दोन’ने मुंबईमधून 30 नोव्हेंबर 2019 रोजी अटक केली. गुन्हा गंभीर असल्यामुळे तिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. अटकपूर्व जामीन अर्जाला फिर्यादीच्या वतीने ऍड. मिलिंद पवार व ऍड. अजय ताकवणे यांनी विरोध केला होता.  तिला आज न्यायालयात हजर करणार आहेत.

अभिनेता सुभाष दत्तात्रय यादव (रा.गुलमोहर सोसायटी, शास्त्री रोड,पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ‘रोल नंबर १८’ चित्रपटाची अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने (रा.दहीटना,नळदुर्ग,ता. तुळजापूर,जि. उस्मानाबाद), दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे (रा. स्वारगेट पोलिस लाइन) आणि सराईत गुन्हेगार राम भरत जगदाळे (रा. पर्वती पायथा, सहकारनगर) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तेव्हापासून सारा श्रवण दुबईमधे पळून गेली होती. अभिनेत्याला खोट्या गुह्यात अडकवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी उपनिरीक्षक अमोल टेकाळे याला निलंबित करण्यात आले आहे.

हा प्रकार 28 सप्टेंबर 2018 रोजी जगदाळे याच्या सहकारनगर येथील कार्यालयात घडला होता. रोहिणी माने व यादव यांनी ‘रोल नंबर अठरा’ या चित्रपटात काम केले आहे. यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर यादवला मिळत असलेली प्रसिद्धि माने आणि श्रवणला पाहवत न्हवती. तसेच माने ही ‘आपल्याशी लग्न कर’ यासाठी यादव यांच्या मागे लागली होती. नंतर वानवडी पोलिस ठाण्यात सर्व आरोपींनी संगनमताने यादव विरुद्ध ‘वानवडी पोलिस ठाण्याच्या वॉशरूममधे घुसून मानेची छेड़ काढली’ असा हास्यास्पद व खोटा आरोप करून विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.

हे सर्व कटकारस्थान असल्याची तक्रार यादवने पुणे पोलिस आयुक्तांकड़े केली.याची माहिती मिळताच दाखल असलेला गुन्हा मिटविण्यासाठी माने,टेकाळे व जगदाळे यांनी यादव यांना जगदाळेच्या कार्यालयात बोलावून घेतले.व दाखल गुन्हा मागे घ्यायचा असल्यास सुभाषने माने ची पाया पडून माफ़ी मागावी व आम्ही त्याचे चित्रीकरण करू, अशी अट घातली. मात्र, सुभाषने या गोष्टीसाठी नकार दिला.विनयभंगाचा गुन्हा खोटा असल्यामुळे माफ़ी मागणार नाही, असे सांगितले. मात्र, त्यानंतर 3 तास सर्वाना जीवे मारण्याच्या व तोंडावर ऍसिड फेकन्याच्या व आणखी खोटे गुन्हे दाखल करू, अशा धमक्या देवून तेथे त्याला व त्याच्या नातेवाइकांना रोहिणी माने हिचे जबरदस्तीने पाय धरून माफी मागण्यास भाग पाडले. त्याचे चित्रीकरण करून 15 लाख रुपयांची मागणी केली. व पैसे न दिल्यास माफ़ी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल करू व विनयभंगाचा गुन्हा देखील मागे घेणार नाही, अशी धमकी दिली.त्यापैकी 1 लाख रुपये त्यांनी स्वीकारले.

त्यानंतर होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून यादव याने उर्वरित रक्कम न देण्याचा निर्णय घेतला.उरलेली रक्कम न दिल्याने जगदाळे, टेकाळे व रोहिणी यांनी संगनमत करून सारा श्रवण हिच्यामार्फत पाय धरून माफी मागतानाचा व्हिडिओ व अनेक खोट्या अफवा सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केली.सारा आणि माने या दोघी मैत्रिणी आहेत.सारा दुबईत वास्तव्यास असल्याने तिला अटक करता आली नव्हती. भारतात आल्यानंतर तीला अटक करण्यात आली.

पुणे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम,पोलिस उपआयुक्त बच्चन सिंग,सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयवंत जाधव पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.