Pune : आता मराठी चित्रपट ग्लोबल झाले आहेत- वर्षा उसगावकर

एमपासी न्यूज – मी चित्रपटांमध्ये काम करीत असताना मराठी चित्रपट हे प्रादेशिक होते.  ही परिस्थिती आज बदलली आहे. आज मराठी चित्रपट हे फक्त प्रादेशिक राहिले नाहीत, तर ते ग्लोबल होत आहेत. त्यामुळे आजच्या अभिनेत्री भाग्यवान आहेत, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर  यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित महिला चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी शुक्रवारी (दि.6) व्यक्त केले.

 

यावेळी आयामच्या मनस्विनी प्रभुणे, प्राची बारी, नम्रता फडणीस, मेघा शिंपी, स्वाती जरांडे आणि अपर्णा देगांवकर, एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम, आशयचे सतीश जकातदार, सुप्रिया चित्राव आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मंदार कुलकर्णी यांनी वर्षा उसगावकर यांची प्रकट मुलाखत घेतली.

 

या वेळी बोलताना वर्षा उसगावकर म्हणाल्या, आज तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. याचा फायदा प्रादेशिक चित्रपटांना मोठ्या प्रमाणात होत आहे. आज मराठी चित्रपट हे साता समुद्रापार पोहोचले आहेत. ही गोष्ट जर माझ्या काळात झाली असती तर मला काम करायला आणखी मजा आली असती. आमच्या वेळी प्रादेशिक कलाकार म्हणून आमच्यावर शिक्का बसला होता. आज ती परिस्थिती नाही. मराठी कलाकारांचे कौतुक आज सगळीकडेच होत आहे आणि त्यामुळेच मला असूया वाटते. आज आर्ट सिनेमे देखील व्यावसायिक यश मिळविताना पाहून एक प्रकारचे समाधान मिळते आहे.”

आज वेबसिरीजला पेव फुटले असून त्यांची वाढणारी संख्या ही चिंताजनक बाब आहे. मात्र असे असले तरी त्यातून हाताळले जाणारे विषय हे मानसिकतेला छेद देणारे आहेत हेही मान्य करायला हवे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

 

महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी वर्षा उसगावकर यांच्या हस्ते पत्रकार करुणा पुरी यांना ‘आयाम महिला पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले. महिला पत्रकारांचा ‘आयाम’ गट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लब यांच्या वतीने  आयोजीत या चित्रपट महोत्सवाचे  हे ११ वे वर्ष असून रविवार दि. ८ मार्च पर्यंत प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे हा महोत्सव होणार आहे. ’रिअल टू रिल’ अशी यंदाच्या महोत्सवाची संकल्पना असून महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.