Pune : दिव्यांगांमध्ये पुण्यात प्रथम आलेल्या ‘सीमा’ला व्हायचंय प्रशासकीय अधिकारी

Fergusson college student Seema Kharad tops disabled category in HSC exam. अंधत्वावर मात करत बारावीत उत्तुंग यश

एमपीसी न्यूज – इयत्ता बारावीचा निकाल काल जाहीर झाला आणि राज्यात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली. फर्ग्युसन महाविद्यालयातून बारावीला 88 टक्के गुण मिळवत दिव्यांग विद्यार्थिनी सीमा खराद हिने घवघवीत यश संपादन केले आहे. सीमा अंध असून ती कला शाखेतून दिव्यांगांमध्ये पुण्यात प्रथम आली आहे. सीमाला प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे.

प्रत्येकाला इतरांप्रमाणे आयुष्य जगायला मिळेलच असे नाही. जन्मतःच दिव्यांग म्हणून जन्मलेल्या विशेष विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात. त्यातही शाळेत जाऊन शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींवर मात करावी लागते. तेंव्हा कुठे जाऊन यशाला गवसणी घालता येते.

अशीच काहीशी कहाणी आहे सीमा खराद हिची. सीमाने जन्मतः मिळालेल्या अंधत्वावर मात करत बारावीत उत्तुंग यश मिळवले आहे.

सीमाच्या या यशाबद्दल आम्ही जेंव्हा तिचे वडिल बळिराम खराद यांना संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की, सीमाला लहानपानापासून शिक्षणाची आवड आहे. इतरांसारखे सहज बाहेर पडणे तिला शक्य नसल्यामुळे जास्त काळ ती अभ्यासात रमते.

बारावीला सहा ते सात तास ती अभ्यास करायची. दिव्यांग मुलांसाठी उपलब्ध असलेल्या ब्रेल लिपीतील पुस्तके मुंबई येथून आम्ही तिला उपलब्ध करून दिली. तसेच श्राव्य माध्यमातूनही तिला विविध गोष्टी शिकायला मिळायच्या.

सीमाला महाविद्यालयात सोडण्याची व घेऊन यायची जबाबदारी सर्व कुटुंबीय पार पडायचे. आज पर्यंत तिच्या शिक्षण प्रवासात तिच्या आई-बाबांचा मोलाचा वाटा आहे. फर्ग्युसन सारख्या महाविद्यालयाची देखील चांगली साथ मिळाल्याचे सीमाचे वडील सांगतात.

मात्र, अंध मुलांसाठी उपयुक्त असणारी ब्रेल लिपीतील पुस्तके बाहेर सहज उपलब्ध होत नसल्यामुळे खूप अडचण होते, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

सीमाला भविष्यात काय करण्याची इच्छा आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, तिला फर्ग्युसन महाविद्यालयातून कला शाखेतूनच पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करायचं आहे.

तसेच तिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षा द्यायच्या आहेत. प्रशासकीय अधिकारी व्हायचे तिचे स्वप्न असल्याचे तिचे वडील म्हणाले.

सीमाचे वडील हे वर्कशॉप व्यावसायिक आहेत. अंध मुलांच्या उच्च शिक्षणासाठी जास्त खर्च येत असला तरी सीमाच्या स्वप्नासाठी बळीराम खराद यांनी शक्य ते सर्व कष्ट करण्याची तयारी दाखविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.