Pune: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात सापडला एक नवीन कोरोनाबाधित रुग्ण

कोल्हापूरात आढळला पहिला कोरोना पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज – मागील दोन दिवसांत एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्याने, उलट पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आनंदात असलेल्या पुणेकरांचा आनंद अल्पकाळाचा ठरला आहे. सहकारनगर भागातील एका रुग्णाच्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 20 झाली आहे. 

दुपारनंतर राज्यात पाच रुग्णांचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 130 झाली आहे. नवीन पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये सांगली जिल्ह्यातील तीन तर कोल्हापूर व पुण्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कोल्हापूरमध्ये सापडलेला हा पहिला कोरोनाबाधित रुग्ण आहे.

पुण्यात आढळलेला कोरोनाबाधित रुग्ण सहकारनगर भागातील 40 वर्षीय पुरुष आहे. लिव्हरच्या आजारावरील उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अन्य चाचण्यांबरोबरच त्याची कोरोना निदान चाचणीही घेण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. संबंधित रुग्ण परदेशात जाऊन आलेला नाही. त्यामुळे तो कोणाच्या संपर्कात आला होता, याची तपशीलवार माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

त्यामुळे पुण्यातील कोरोनाच्या संसर्गाचा धोका कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.