Pune : अडीच महिन्यानंतरही महापूरग्रस्तांना काहीच मदत नाही; सर्वपक्षीय नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड

एमपीसी न्यूज – अडीच महिने होऊनही महापूरग्रस्तांन महापालिका प्रशासनाने कोणतीही मदत केली नाही, आशा शब्दांत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर आज आगपाखड केली. महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवक आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

यावेळी सुभाष जगताप म्हणाले, या महापुरामुळे शेकडो नागरिकांचे नुकसान झाले. टांगेवला कॉलनीत 6 नागरिकांचा जीव गेला. किती नुकसान झाले, याची महापालिकेकडे माहितीच नाही. आंधळा, हलगर्जीपणा कारभार चाललंय. अतिक्रमणे होऊ न देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. अडीच महिने झाले, संसार उध्वस्त झाले, आता हे नागरिक उघड्यावर आलेत. वेदना हरवून प्रशासन बसले का? नैसर्गिक आपत्ती ही शासनाची मदत असल्याचे सांगतात. या पूर्वी महापालिकेने मदत केली. उपयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून तातडीने मदत करा, अरणेश्वर मंदिर शेजारी पूल हाइट फार कमी आहे. ग्रे वाटर ओढ्यातच केले, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले. महापालिकेने जो उपद्व्याप केला. त्याची निवृत्ती न्यायाधीशामार्फत चौकशी करा, अशीही मागणी त्यांनी केली.

धीरज घाटे म्हणाले, आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. पाणी शिरल्यामुळे होत नव्हतं सर्व वाहून गेले. अडीच महिने झाले तरी पुनर्वसन नाही. आयुक्त तुम्ही एक दिवस तरी महापालिका शाळेत राहू शकाल का? सभासदांनी नेमके काय करावे म्हणजे त्यांना जाग येईल, कालवा फुटीमुळे सीमाभिंत फुटल्या. या भिंती बांधणार आहोत की नाही, याचा खुलासा करावा.

राणी भोसले म्हणाल्या, 25 सप्टेंबर रोजी आलेल्या पुराला आता दोन महिने पूर्ण झाले. प्रशासनाने नेमक्या काय उपाययोजना केल्या?, अतिक्रमणावर कारवाई होणार होती, त्याचे काय झाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

माजी महापौर दत्ता धनकवडे म्हणाले, या महापूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे काय पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांकडूनही तुटपुंजी मदत मिळाली. महापालिकेने नागरिकांना मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

महेश वाबळे म्हणाले, या महापुरात कोट्यवधी रुपयांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. सोसायट्यांच्या सीमाभिंतिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरिकांना टॅक्समध्ये सवलत देण्यात यावी.

हरिदास चरवड म्हणाले, प्रायेजा सिटीजवळील रस्ता वाहून गेला. त्यामुळे सिंहगड रस्ता, नांदेड सिटीकडे प्रवास करता येत नाही. तर, नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. वॉर्ड ऑफिसला तक्रार करूनही काहीही उपयोग होत नसल्याचे प्रमोदनाना यांनी सांगितले. नंदा लोणकर, हाजी गफूर पठाण, भैय्या जाधव, राजश्री शिळीमकर, मनीषा कदम, सुशील मेंगडे यांनीही नाराजी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.