Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी शिवसेनेने सुचविले उपाय

Against the backdrop of Corona, Shiv Sena suggested measures to increase the income of the Municipal Corporation

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने पुणेकरांसाठी काही सवलती व पुणे महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी शिवसेनेतर्फे काही पर्याय सुचवले आहेत. महापालिकेने मिळकत कर आणि बांधकाम परवाना शुल्क वाढीवर लक्ष केंद्रित करावे, अनधिकृत घरांसाठी अमनेस्टी योजना, नगरसेवकांच्या मानधनात कपात करावी, 800 चौरस फुटांपर्यंत घरांना मिळकत कर माफी द्यावी, अशा उपाययोजना शिवसेनेकडून सुचविण्यात आल्या आहेत.

याबाबतचे निवेदन शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे. यावेळी शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, सहसंपर्क प्रमुख शाम देशपांडे, अजय भोसले व प्रशांत बधे उपस्थित होते.

लॉकडाउनमुळे महापालिकेच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असून महापालिका अंदाजपत्रकाची पुर्नमांडणी आवश्यक आहे. जीएसटी मधील अपेक्षित वाटा कमी होणार आहे. मिळकत कर आणि बांधकाम परवाना शुल्क वाढीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

अनधिकृत घरांना 2008 पासून तिप्पट दराने घरपट्टी आकारली जात आहे. त्यामुळे नागरिक ती भरात नाही. ही थकबाकी ४०० कोटी रुपये आहे. यासाठी अमनेस्टी योजना लागू करावी. अधिकृत निवासी, बिगरनिवासी मिळकतींचे आणि जुन्या वाड्यांचे मिळकत कर बऱ्याच काळापासून थकीत आहेत. यांनाही अमनेस्टी योजना लागू करून दंड माफ करावा.

केंद्र शासनाने महापालिकेला 200 कोटी रुपये द्यायचे आहेत, त्याचा वापर झोपडपट्टी व दाट वस्ती विभागातील कोरोना तपासणीसाठी करावा.

एसआरए व ईडब्ल्यूएसमधून मिळालेल्या सदनिका आपण प्रकल्प बाधितांना भाडेतत्त्वावर देतो. त्याचे भाडे वसूल होणे व त्याची देखभाल दुरुस्ती करणे हे खर्चिक काम झाले असून अशा सदनिका पैकी २० टक्के सदनिका महापालिकेसाठी राखून ठेवाव्यात व उर्वरीत सदनिका भाडेकरूंना किंवा इतर गरजूंना पंतप्रधान आवास योजनेखाली कर्ज उपलब्ध करून त्या मालकी तत्त्वावर दिल्यास अंदाजे 500 कोटीच्या वर उत्पन्न मनपास मिळेल.

महापापालिकेच्या ताब्यातील अमेनिटी स्पेस या व्यापारी तत्त्वावर विकसनास देऊन त्यातून 800 ते 900 कोटी रुपये उत्पन्न मिळवता येणे शक्य असल्याचे मोरे यांनी महापालिका आयुक्तांच्या निर्दशनास आणून दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.