Pune : महापालिकेतील पदे मिळण्यासाठी काकडे गट आक्रमक; बापट म्हणतात ‘सर्व आपलेच’

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपद किंवा सभागृह नेते पद मिळविण्यासाठी काकडे गट अत्यंत आक्रमक झाला आहे. राज्यात काँगेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता काकडे गटाला दुरावून चालणार नाही. त्यांना आता मनाचे पद द्यावेच लागेल, यावर भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. तर, सर्व नगरसेवक आपलेच असल्याची सारवासारव खासदार गिरीश बापट यांनी केली.

पुणे शहरात भाजपचे 4 गट निर्माण झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गटाला महापौरपद देण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गटाला ‘पीएमपीएमएल’चे संचालक पद मिळणार असल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीत भाजपचा वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघांत दानकावून पराभव झाल्यानंतर पदाधिकारी बदलण्याची मागणी करण्यात आली. या दोन्ही मतदारसंघांत पराभव होण्यास महापालिकेतील करभरच कारणीभूत असल्याचे वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे आहे त्या पदाधिकाऱ्यांकडून तडकाफडकी राजीनामे घेण्यात आले.

धरणांत 100 टक्के पाणीसाठा असताना हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत दोन वेळ नागरिकांना पाणी देता आले नाही. शिवाजीनगर मतदारसंघात पाणी नाही तर, मत नाही, अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. पण, माजी खासदार अनिल शिरोळे आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी हा प्रश्न व्यवस्थित हाताळला.

स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी काकडे गट तर, सभागृह नेता पदासाठी बापट गट आग्रही आहे. ‘पीएमपीएमएल’ संचालक पदासाठी धक्कादायक नाव समोर येणार असल्याची कुजबुज आहे. इतर पक्षातून येऊन भाजपमध्ये प्रवेश करून नगरसेवक झालेल्यांची सांख्य 30 च्या आसपास आहे. हे सर्व नगरसेवक राज्यसभेचे खासदार संजयनाना काकडे यांचे कट्टर समर्थक समजले जातात. स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनीही 2017 च्या महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपमध्ये ‘ईनकमिंग’ वाढविण्यासाठी पुढाकार घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.