Pune : सुधारित नागरिकत्व कायदा अंमलबजावणीस प्रखर विरोध ; पुण्यात मोर्चा

एमपीसी न्यूज- सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची यांच्याविरोधात रविवारी पुण्यामध्ये हजारो नागरिकांनी मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. कुल जमाते तंजीम आणि सीएए, एनआरसीविरोधी महारॅली नियोजन समितीतर्फे ‘संविधान बचाव, देश बचाव महारॅली’चे आयोजन करण्यात आले होते.

गोळीबार मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये मुस्लिम समाजातील विविध पंथांचे उलेमा, महिलांसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि संघटनांचे कार्यकर्ते हातात तिरंगा आणि फलक घेत सहभागी झाले होते. विधान भवन येथे रॅलीचे सभेत रूपांतर झाले.

‘मोदी सरकारने केलेले कायदे आम्हाला भारतीय समजत नसल्याने हे कायदे आम्ही मानणार नाही. या कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आम्ही घटनात्मक चौकटीत लढा देऊ’, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. चार मिनार, कुतुब मिनार आणि लाल किल्ला हीच आमची कागदपत्रे आहेत. त्यामुळे आम्ही कोणतीही कागदपत्रे दाखविणार नाही,’ अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली.

भारत हा कोणत्याही एका जातीचा, धर्माचा आणि भाषेचा देश नाही. विविध संस्कृती गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात, हेच भारताचे वैशिष्टय़ असून, त्या माध्यमातूनच देशामध्ये लोकशाही रुजली आहे. मात्र, या सरकारकडून त्यावरच हल्ला केला जात असून धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांच्या हौतात्म्यावरचा हा हल्ला आहे, असा आरोप विद्यार्थी नेता उमर खालिद यांनी केला.

या मोर्चाच्या मार्गावरील वाहतूक सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती. स्वारगेट, लष्कर परिसर, भवानी पेठ आणि पुणे स्थानक परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले होते. मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.