Pune : भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांना हेल्मेटसक्ती विरोधी आंदोलनकर्त्यानी हुसकावले

एमपीसी न्यूज- पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भाजप आमदार मेधा कुलकर्णी या देखील सहभागी झाल्या होत्या. त्या दरम्यान पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. मेधा कुलकर्णी यांनी त्यावर आक्षेप घेतला असता आंदोलनकर्त्यांनी त्यांना हुसकावून लावले.

पुणे वाहतूक पोलिसांनी 1 जानेवारी पासून हेल्मेटसक्ती केली आहे. या हेल्मेटसक्तीला आज महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीने महात्मा फुले मंडई चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीचे संयोजक माजी महापौर अंकुश काकडे, भाजप आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, नगरसेवक विशाल धनवडे, माजी नगरसेविका रूपाली पाटील, माजी नगरसेवक धनंजय जाधव, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे तसेच शहरातील विविध संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

आंदोलनाच्या दरम्यान पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. मेधा कुलकर्णी यांनी त्यावर आक्षेप घेत पालकमंत्री आणि पक्षाबद्दल बोलू नका असे सांगताच आंदोलनकर्त्यांनी मेधा कुलकर्णी यांना दादागिरी करू नका अशा घोषणा देत त्यांना हुसकावून लावले.

या घटनेनंतर आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, मी हेल्मेट सक्तीच्या विरोधात असून आंदोलनामध्ये सहभागी होण्यास आले. तसेच पुणे शहरात ज्या प्रकारे हेल्मेटसक्ती पोलिसाकडून राबविली जात आहे. त्याबाबत येत्या महिनाभरात राज्यसरकारकडून नागरिकांच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.  तर आंदोलनकर्त्यानी केलेल्या कृत्याबाबत बोलण्यास नकार दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.