Pune : विरोधकांचा रिकामे हंडे घेऊन महापौरांसमोर ठिय्या

एमपीसी न्यूज- गेल्या आठवड्यापासून पुणे शहरात गाजणाऱ्या पाणीप्रश्नावरुन महापालिकेत देखील प्रचंड गदारोळ करण्यात आला. शहरातील सर्व भागात विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेले विरोधी पक्षांचे नगरसेवक हंडे-कळशा घेऊन महापालिकेत आले. महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरच ठाण मांडत मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.

कालवा समितीच्या बैठकीत पुणे महापालिकेला देण्यात आलेल्या दररोजच्या पाण्याचे प्रमाण वाढत्या शहरीकरणामुळे पुरेसे नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक पाणी उचलते. यंदा प्रथमच पाटबंधारे विभागाने या प्रकाराला चाप लावत चक्क महापालिकेच्या पाण्याचे पंप पोलिसांच्या उपस्थितीत बंद केले.

अर्थात महापालिकेला या प्रकारची कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याने ऐन नवरात्रीत शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. याच विषयावर मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने आंदोलन केले. यावेळी नगरसेवकांनी थेट हंडे-कळशा घेत महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरच ठाण मांडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.